कोलकाता बलात्कार प्रकरणावरून कुमार विश्वास यांचा जया बच्चन, महुआ मोइत्रा यांच्यावर निशाणा, काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 04:49 PM2024-08-18T16:49:11+5:302024-08-18T16:51:21+5:30
विश्वास यांनी एका पॉडकास्टमध्ये महुआ मोईत्रा आणि जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला...
कोलकात्यातील आरजी कर रुग्णालयात ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एका पॉडकास्टमध्ये महुआ मोईत्रा आणि जया बच्चन यांच्यावर याप्रकरणी मौन बाळगल्याबद्दल निशाणा साधला. मात्र, कुमार यांनी कुणाचेही नाव घेतले नाही.
यूट्यूबर शुभंकर मिश्रासोबत बोलताना कुमार विश्वास म्हणाले, या घटनेवर बंगालचा आवाज आज शांत आहे. खरे तर, येथे कुमार विश्वास यांचा इशारा टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्याकडे होता. कोलकाता बलात्कार प्रकरणी त्यांनी मौन बाळगल्याने विश्वास यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
जया बच्चन यांच्यावरही भडकले -
समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांच्या संदर्भात बोलताना कुमार विश्वास म्हणाले, आपल्या नावात पतीचे नाव येऊ नये, असे म्हणणारा विजयी आवाज आज शांत आहे. या पक्षाच्या महिला आहेत, ज्या महिला नाही, तर पक्षाचे हीत डोळ्यासमोर ठेऊन संसदेत बोलतात. कुमार विश्वास यांचा इशारा जया बच्चन यांच्याकडे होता.
मुख्यमंत्री ममता निशाण्यावर -
कोलकात्यातील रुग्णालयात घडलेल्या या घटनेनंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निशाण्यावर आहे. ममता बॅनर्जी सत्य लपवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. शनिवारी भाजप नेते संबित पात्रा यांनीही ममता बॅनर्जींवर निशाणा साधत, त्या काहीतरी लपवत असल्याचे म्हटले होते.
काय म्हणाले होते संबित पात्रा? -
संबित पात्रा म्हणाले, 'एका राज्याचा मुख्यमंत्री त्याच्याच राज्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर रस्त्यावर उतरल्याचे पहिल्यांदाच बघितले. ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरून लोकांना संभ्रमित करत आहेत. मात्र, जनता जनार्दनाने ममता बॅनर्जी यांचे सत्य जाणले आहे. यापूर्वीही भाजपच्या अनेक नेत्यांनी या घटनेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.