कुमारस्वामी यांना काँग्रेसचा पाठिंबा पूर्ण पाच वर्षांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 05:03 AM2018-06-02T05:03:40+5:302018-06-02T05:03:40+5:30
कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी हेच पाच वर्षे मुख्यमंत्री असतील, त्यांना पुढील पाच वर्षे आमचा पाठिंबा असेल, हे काँग्रेसने स्पष्ट केले
बंगळुरू/नवी दिल्ली : कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी हेच पाच वर्षे मुख्यमंत्री असतील, त्यांना पुढील पाच वर्षे आमचा पाठिंबा असेल, हे काँग्रेसने स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्यातील तक्रारी संपल्याचे दिसते. खातेवाटपाबाबतही दोन्ही पक्षांमध्ये मतैक्य झाले आहे. येत्या लोकसभा निवडणुकाही हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढवणार आहेत.
कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पाठिंबा देण्याबाबत निर्णय झालेला नाही, असे विधान उपमुख्यमंत्री व कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर यांनी केले होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराआधीच दोन्ही पक्षांत कुरबुरी सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले होते. कुमारस्वामी यांनीही आपण काँग्रेसच्या दयेवर अवलंबून असल्याचे विधान त्यामुळे केले होते. काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी मात्र कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचा पुढील पाच वर्षे पाठिंबा राहील, असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे दोन महत्त्वाच्या खात्यांवरही एकमत झाले आहे. जनता दलाकडे अर्थ खाते, तर काँग्रेसकडे गृह खाते असेल, असा निर्णय दोन्ही पक्षांनी मिळून घेतला. वादावादी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते मिळून किमान समान कार्यक्रम निश्चित करतील, असेही ठरले आहे.
राज्य पातळीवर दोन पक्षांत एखाद्या निर्णयाबाबत मतभेद झाल्यास, त्याची जाहीर वाच्यता करण्याऐवजी दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी ते सोडवावेत, असेही दोघांत ठरले आहे. अर्थात हे सारे तोंडी स्वरूपात न ठेवता, त्याचा लेखी मसुदा तयार केला जाईल आणि कुमारस्वामी यांना पाच वर्षे पाठिंबा देत असल्याचा काँग्रेसचा निर्णयही लेखी स्वरूपात दिला जाईल, असे नक्की करण्यात आले आहे, असे जनता दलाचे सरचिटणीस दानिश अली यांनी स्पष्ट केले.
दोन्ही पक्षांमध्ये खात्यांचे वाटपही कसे होणार हे निश्चित झाले आहे. काँग्रेसच्या वाट्याला २२ मंत्रिपदे आली आहेत ज्यात गृह, जलसंपदा, आरोग्य, शेती, महिला आणि बालकल्याण आदींचा समावेश आहे. तर जनता दलाला मिळालेल्या १२ खात्यांमध्ये अर्थ, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, पर्यटन, वाहतूक आदींचा समावेश आहे.