आयडियाची कल्पना! महाकुंभमध्ये मुलं हरवू नये म्हणून आई-वडिलांनी केला देसी जुगाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 19:14 IST2025-02-12T19:14:05+5:302025-02-12T19:14:51+5:30
कुंभमेळ्यात गर्दी इतकी असते की, मुलं हरवण्याचा धोका नेहमीच असतो. पण भोपाळमधील एका कुटुंबाने या समस्येवर एक अनोखा उपाय शोधला.

फोटो - आजतक
प्रयागराज कुंभमेळ्यात गर्दी इतकी असते की, मुलं हरवण्याचा धोका नेहमीच असतो. पण भोपाळमधील एका कुटुंबाने या समस्येवर एक अनोखा उपाय शोधला. कुंभमेळ्याला येण्यापूर्वी, कुटुंबाने त्यांच्या लहान मुलांच्या हातावर मेहंदी काढून त्यांच्या पालकांचं नाव आणि मोबाईल नंबर लिहिला आहे, जेणेकरून जर मुलं हरवली तर त्यांच्या कुटुंबाशी सहज संपर्क साधता येईल.
माघी पौर्णिमेच्या स्नानासाठी भोपाळहून आलेल्या या कुटुंबात एकूण ११ लोक होते, ज्यात ३ ते ५ वर्षे वयोगटातील ४ लहान मुलं होती. गर्दीच्या ठिकाणी मुलं हरवण्याच्या घटना सामान्य आहेत, म्हणून या कुटुंबाने आधीच तयारी केली होती.
मुलांच्या हातावर मेहंदी काढण्याचा देसी जुगाड लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. पालकांना असा विश्वास वाटत होता की, जर मुलं गर्दीत हरवली तर कोणीही त्यांच्या हातावर लिहिलेल्या नंबरवर कॉल करून कुटुंबाशी संपर्क साधू शकतं.
कुंभमेळ्यातील इतर भाविकांना जेव्हा या युक्तीबद्दल कळलं तेव्हा अनेकांनी ते अवलंबण्याचा विचार करायला सुरुवात केली. गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये मुलांचे संरक्षण करण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग मानला जात आहे.
कुंभमेळ्यादरम्यान, लाखो भाविक संगमात स्नान करण्यासाठी येतात, परंतु मुलं हरवण्याच्या घटना पालकांसाठी सर्वात मोठी चिंता असते. अशा परिस्थितीत, भोपाळच्या या कुटुंबाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.