कुंभमेळ्यात स्नान करण्यायोग्य होतं संगमाचं पाणी? लोकसभेत अहवाल सादर करत मोदी सरकारचा मोठा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 19:40 IST2025-03-10T19:39:38+5:302025-03-10T19:40:54+5:30
२८ फेब्रुवारी २०२५ रोजी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (NGT) एक दीर्घ अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, संगमाचे पाणी सर्व निर्धारित मानकांची पूर्तता करत होते आणि ते स्नानासाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे.

कुंभमेळ्यात स्नान करण्यायोग्य होतं संगमाचं पाणी? लोकसभेत अहवाल सादर करत मोदी सरकारचा मोठा दावा!
उत्तर प्रदेशातील प्रयाग राज येथे नुकताच कुंभमेळा पार पडला. देश-विदेशातील कोट्यवधी भावीक कुंभमेळ्यादरम्यान येथील संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी आले होते. मात्र, काही मंडळींनी येथील पाण्याच्या शुद्धतेवर आक्षेप घेतला होता. पण आता संगमावरील गंगेचे पाणी कुंभमेळ्यादरम्यान स्नानासाठी योग्य होते, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले आहे.
२८ फेब्रुवारी २०२५ रोजी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (NGT) एक दीर्घ अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, संगमाचे पाणी सर्व निर्धारित मानकांची पूर्तता करत होते आणि ते स्नानासाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, कुंभमेळा काळात गंगेचे पाणी स्नान करण्यायोग्य नव्हते, असे CPCB ने NGT ला दिलेल्या माहितीत म्हटले होते? गंगेच्या पाण्यात अधिक प्रमाणावर मल-मूत्र होते? असा प्रश्न समाजवादी पक्षाचे खासदार आनंद भदौरिया यांनी लोकसभेत उपस्थित केला होता.
सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्डाचा नवा अहवाल -
पर्यावरण मंत्रालयाने उत्तरात सांगितले की, 3 फेब्रुवारी 2025 रोजी CPCB ने NGT कडे अहवाल सादर केला होता, यात 12 ते 26 जानेवारी दरम्यान करण्यात आलेल्या परीक्षणाच्या आधारे, संगमाचे पाणी स्नान करण्यायोग्य नव्हते, असे सांगण्यात आले होते. यावर, NGT च्या निर्देशानुसार, सविस्तर तपासणी करण्यात आली, यात दिवसातून दोन वेळा पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर केलेल्या अंतिम अहवालात संगमाचे पाणी आंघोळीसाठी योग्य असल्याचे दिसून आले.
गुणवत्ता राखण्यासाठी सरकारने केलेली कामे -
यावेळी, कुंभमेळ्यादरम्यान पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अनेक पावले उचलल्याचेही लोकसभेत सांगण्यात आले. जसे, घाणेरडे पाणी थेट नदीपात्रात येणार नाही यासाठी काळजी घेण्यात आली. कुंभ परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या.