इअरफोननं केला घात, गाणी ऐकत गाडी चालवणं 13 निष्पाप मुलांच्या जिवावर बेतलं !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 11:05 AM2018-04-26T11:05:54+5:302018-04-26T12:33:35+5:30
कुशीनगर अपघातात 13 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मानवरहित क्रॉसिंगसंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुरुवारी उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात काही प्रमाणात गाडी चालकाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे.
लखनऊः कुशीनगर अपघातात 13 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मानवरहित क्रॉसिंगसंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुरुवारी उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात काही प्रमाणात गाडी चालकाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. रेल्वे क्रॉसिंग दुर्घटना घडली त्यावेळी गेटमन तैनात होता.
स्कूल व्हॅन क्रॉसिंग करत असताना समोर येणा-या रेल्वेची सूचना या गेटमननं गाडीचालकाला दिली होती. गेटमन आवाज देत होता. परंतु गाडीचालकानं कानात एअरफोन घातलेले असल्यानं त्याच्यापर्यंत गेटमनचा आवाज पोहोचलाच नाही. गाडीचालकाच्या हा बेजबाबदार कृत्यामुळे आपण 55075 ट्रेनच्या जवळ जातोय याचा अंदाजच आला नाही आणि बघता बघता ट्रेननं स्कूल व्हॅनला धडक दिली. या अपघातात गाडीचालक आणि 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 विद्यार्थी गंभीररीत्या जखमी आहेत.
डिव्हाइन पब्लिक स्कूलची टाटा मॅजिक गाडी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत निघाली होती. ही व्हॅन दुदही रेल्वे फाटकावर आली असतानाच ट्रॅकवरून थावे-बढनी पॅसेंजर येत होती. त्याचवेळी व्हॅनच्या चालकाने ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने पॅसेंजरची धडक व्हॅनला बसली. या धडकेने व्हॅनचा चेंदामेंदा झाला. तर व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच व्हॅन चालकाचाही या अपघातात मृत्यू झाला.