कुतुबमीनार कलतोय...
By admin | Published: March 3, 2016 04:25 AM2016-03-03T04:25:40+5:302016-03-03T04:25:40+5:30
कुतुबमीनार हळूहळू आपल्या पायापासून कलतो आहे. परंतु हे कलणे किरकोळ आहे, असे सरकारला वाटते. मात्र तो कलू नये, यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : कुतुबमीनार हळूहळू आपल्या पायापासून कलतो आहे. परंतु हे कलणे किरकोळ आहे, असे सरकारला वाटते. मात्र तो कलू नये, यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी बुधवारी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांच्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
डेहराडून येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाद्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, कुतुबमीनार आपल्या पायाच्या तुलनेत दरवर्षी सरासरी ३.५ सेकंद दराने कलतो आहे, जे नगण्य आहे. हा पाया मजबूत राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, असेते म्हणाले.
हिंदू-जैन प्रतिमा सापडल्या
कुतुबमीनार शेजारी संरक्षण आणि वैज्ञानिक साफसफाई दरम्यान हिंदू आणि जैन मंदिरांचे काही वास्तुशिल्पीय अवशेष सापडले होते. त्यातील काही अवशेष कुतुब परिसरात प्रदर्शित केले आहेत, तर उर्वरित प्रतिमांना त्याच परिसरात संरक्षित करण्यात आले आहे, असे शर्मा यांनी सांगितले. कुतूबमीनार परिसरात कोणतेही उत्खनन करण्यात आलेले नाही, केवळ वैज्ञानिक साफसफाई तेवढी करण्यात आली, असा दावाही शर्मा यांनी यावेळी केला.
समीक्षा समिती नाही
सरकारने मुलकी-लष्करी संबंधांची समीक्षा करण्यासाठी कोणतीही विशेषज्ज्ञ समिती
गठित केलेली नाही, अशी माहिती
खा. दर्डा यांनी विचारलेल्या
एका प्रश्नाच्या उत्तरात
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)