भारतापेक्षा ३ पटीनं अधिक पैसे; कुवैतमध्ये छोट्या कामासाठी मिळतो 'इतका' पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 07:35 PM2024-06-12T19:35:38+5:302024-06-12T19:36:30+5:30
Kuwait Fire: कुवैतमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली असून या आगीत ४५ हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण कुवैतमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीत जवळपास ४९ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात मजूर, कामगार राहायचे. भारतातून दरवर्षी लाखो लोक कुवैतला आखाती देशांमध्ये कामासाठी जातात. त्याचे सर्वात मोठं कारण म्हणजे याठिकाणी मिळणारा पगार. सर्वसाधारण आखाती देशात छोट्या मोठ्या कामांसाठी भरपूर पैसे मिळतात. कुवैतमध्ये भारतीय मजूरांच्या नोकरीत मिळणाऱ्या किमान पगाराबद्दल अखेरचं जानेवारी २०१६ मध्ये माहिती प्रसिद्ध झाली होती.
कुवैतस्थित भारतीय दूतावासाच्या वेवसाईटवर ही माहिती आहे. दुबई, सौदी अरब, कतार, इराण, कुवैत यासारख्या देशात भारतीय प्रोफेशनल आणि मजुरांची मागणी जास्त आहे. त्यामुळे भारतातून दरवर्षी हजारो लोक कामासाठी आखाती देशांमध्ये विशेषत: कुवैतमध्ये जात असतात. या मजुरांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्थाही संबंधितांकडून केली जाते.
कुवैतमध्ये मजुरांना किती पगार मिळतो?
कुवैतमध्ये अकुशल कामगारांना, हेल्पर,क्लीनर यांना दर महिना १०० कुवैती दिनार मिळतात. भारतीय चलनात याची किंमत २७ हजार २६६ रुपये असते. त्यात कृषी काम करणारे, कार धुणारे, बांधकाम मजूर, बाग सांभाळणारे आणि अन्य मजुरांचा समावेश असतो. गॅसकटर, लँथ वर्करसह अवजड मशीनवर काम करणाऱ्या मजुरांना १४० ते १७० कुवैती दिनार म्हणजे ३८ हजारापासून ४६ हजारापर्यंत दरमहिना पगार मिळतो.
भारतात मजुरांना किती पगार?
भारतातील विविध राज्यात अकुशल कामगारांना किमान पगार वेगवेगळा आहे. इंडिया ब्रीफिंगनुसार, अंदमानात मजुरीसाठी १६,३२८ रुपये, आंध्र १३,००० , अरुणाचल प्रदेशात ६६०० रुपये, आसाम ९८०० रुपये, बिहार १०६६० रुपये, चंदीगड १३६५९ रुपये, मुंबई १२००० रुपये दरमहिन्याला दिले जातात. एका दृष्टीने भारताच्या तुलनेत कुवैतमध्ये मजुरांना २ ते ३ पटीने अधिक मजुरी मिळते.
१ कुवैती दिनार म्हणजे २७२ रुपये
एका कुवैती दिनारची किंमत भारतीय चलनात २७२ रुपये इतकी असते. जर तुम्ही महिन्याला १०० कुवैती दिनार कमवत असाल ती रक्कम २७,२०० रुपये होते. कुवैतमध्ये एका कुशल कामगाराला सरासरी पगार १२६० कुवैती दिनार म्हणजे महिन्याला ३ लाख ४३ हजार, ३२४ रुपये असतो. कुवैतमध्ये एका भारतीयासाठी किमान वेतन जवळपास ३२० कुवैती दिनार म्हणजे ८७ हजार १९३ रुपये दरमहिना असते.