'जय श्रीराम'च्या घोषणेनं त्रास होतो, मग 'हे' कसं चालतं?; 'तो' व्हिडीओ पोस्ट करत भाजपचा ममता बॅनर्जींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 03:40 PM2021-01-25T15:40:06+5:302021-01-25T15:42:34+5:30
कोलकात्यातील कार्यक्रमादरम्यान जय श्रीरामच्या घोषणेनंतर ममता बॅनर्जींनी व्यक्त केला होता संताप
कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्रीममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. तसंच त्यांनी ही गर्दी एका खास पक्षाची असल्याचा आरोप भाजपावर केला होता. कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध दर्शविला. यावरूनच भाजपंनं ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
भाजप बंगालनं रविवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. "जर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पश्चिम बंगाल सरकारच्या एका कार्यक्रमात इस्लामिक प्रार्थना करू शकतात. तर त्यांना जय श्रीराम बोलण्यात काय त्रास होतो? तुष्टीकरण? त्यांनी पश्चिम बंगालला बदनाम केलं आहे आणि नेताजींच्या जयंतीच्यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात आपल्या आचरणानं त्यांनी नेताजींच्या वारशाचा अवमान केला आहे," असं भाजपनं म्हटलं आहे.
If CM Mamata Banerjee can recite an Islamic prayer at a West Bengal government event, why does she have a problem being greeted with Jai Shree Ram?
— BJP Bengal (@BJP4Bengal) January 24, 2021
Appeasement?
She disgraced Bengal and insulted Netaji’s legacy by her conduct at the event to commemorate Netaji’s anniversary. pic.twitter.com/OpQ7MR60m2
या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी या इस्लामिक प्रार्थना करताना दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओ केव्हाचा आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी ला इलाहा इल्लल्लाह…असं म्हणताना दिसत आहेत. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महासचिव डॉ. सुरेंद्र जैन यांनीदेखील ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. "जय श्रीराम म्हमताना केवळ रावणाला अपमानित झाल्यासारखं वाटायचं. आता सेक्युलर माफियांना अपमानित झाल्यासारखं वाटतं. हरण्याची भीती एवढं हताश करते? राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार प्रभू श्रीराम हे आपल्या देशाचा आत्मा आहेत. ज्यांचं नाव जपल्यानंतर देशाला अभिमान वाटतो," असं ते म्हणाले.
हे वळूला लाल कपडा दाखवल्यासारखं
भाजपचे नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. "ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कपडा दाखवण्यासारखं आहे. याच कारणामुळे त्यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आपलं भाषण थांबवलं" असं विज यांनी म्हटलं. अनिल विज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मला वाटते की, सरकारच्या कार्यक्रमात काही मोठेपण असले पाहिजे. हा राजकीय कार्यक्रम नाही. एखाद्याला आमंत्रण केल्यानंतर अपमान करणे आपल्याला शोभा देत नाही," असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.