लालूंच्या अडचणीत वाढ, ईडीकडून गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 05:43 PM2017-07-27T17:43:03+5:302017-07-27T17:45:08+5:30
बिहारच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आज अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात मनी लाँडरिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पाटणा, दि. 27 - बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. बिहारच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आज अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात मनी लाँडरिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
2016 मध्ये रेल्वेमंत्री असताना लालूप्रसाद यादव यांनी आयआरसीटीसीचे बीएनआर आणि सुजाता या हॉटेलांच्या दुरुस्तीच्या कामांच्या निविदांमध्ये कथितरित्या भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लालूप्रसाद यादव यांच्यासह त्यांची पत्नी राबडीदेवी आणि लहान मुलगा तेजस्वी यादव यांच्याविरोधात सुद्घा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आज अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.
ED files PMLA case against Lalu Yadav and his family over railway hotel tender matter
— ANI (@ANI_news) July 27, 2017
दरम्यान, भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने 7 जुलै रोजी लालू प्रसाद यादव, पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी यादव आणि आयआरसीटीसीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांसह पाच इतर पाच जणांविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. लालूप्रसाद यांच्याशी संबंधित 12 ठिकाणांवर छापेमारीही केली होती. तसेच, सीबीआयने तिघांची चौकशी केली होती. सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर आता ईडीनेही त्यांच्याविरोधातील कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे, बेनामी संपत्तीप्रकरणी आयकर विभागाने लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांची आधीच 180 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच, आयकर विभागाने त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.