अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 01:21 PM2024-09-27T13:21:49+5:302024-09-27T13:27:52+5:30
आयकर विभागाने एका मजुराला तब्बल २ कोटी ३ हजार ३०८ रुपयांची नोटीस पाठवली आहे.
बिहारच्या गयामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयकर विभागाने एका मजुराला तब्बल २ कोटी ३ हजार ३०८ रुपयांची नोटीस पाठवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गया येथील नवीन गोडाऊन परिसरात राहणारा राजीव कुमार वर्मा हा मजुरीचं काम करतो. त्याचं सर्वकाही सुरळीत चाललं होतं पण अचानक आयकर विभागाच्या नोटीसने त्याला मोठा धक्का बसला आहे.
राजीव कुमार वर्मा याने सांगितलं की, त्याने २२ जानेवारी २०१५ रोजी गया येथील कॉर्पोरेशन बँकेच्या शाखेत २ लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले होते. पण मुदतपूर्तीपूर्वी त्याने काही कामासाठी १६ ऑगस्ट २०१६ रोजी हे पैसे काढून घेतले. त्यानंतर मजुरीचं काम सुरू केलं. मात्र आता अचानक आयकर विभागाने २ कोटी ३ हजार ३०८ रुपयांची नोटीस पाठवली आहे.
२०१५-१६ या वर्षात २ कोटी रुपयांची फिक्स डिपॉझिट करण्यात आली होती, ज्याची रिटर्न फाइल अद्याप भरलेली नाही आणि आयकर विभागाचा करही जमा करण्यात आलेला नाही, असं नोटिसमध्ये सांगण्यात आलं आहे. त्याचवेळी, मजूर राजीव कुमार वर्माचं नावही प्रथमच आयकर रिटर्न फाईलमध्ये आलं. आता महिन्याला १० ते १२ हजार रुपये मजुरी मिळत असेल तर काय कर भरणार असंही मजुराने म्हटलं आहे.
आयकर विभागाच्या नोटीसनंतर मजूर गेल्या ४ दिवसांपासून कामावर गेलेला नाही. नोटीसनंतर, तो चिंतेत पडला आणि आयकर विभागाच्या कार्यालयात गेला आणि तेथील अधिकाऱ्याशी बोलला, ज्यावर अधिकाऱ्यांनी त्याला उत्तर दिलं की आता त्याने पाटणा आयकर विभागाच्या कार्यालयात जावं. जिथून निदान करता येईल. या संपूर्ण घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.