Coronavirus: मजुरांचे लोंढे निघाले गावाकडे; लाखोंचे स्थलांतर, संसर्गाची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 01:40 AM2020-03-29T01:40:08+5:302020-03-29T06:25:30+5:30
राहण्या-जेवणाची सोय करण्याच्या केंद्राच्या सूचना
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संपूर्ण देशभर संचारबंदी असली तरी शहरांतील रोजगार गेल्याने लाखो लोक आपल्या कुटुंबियांसह चालतच गावी निघाले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना गावी पोहोचण्यासाठी २०० ते ३०० किलोमीटर अंतर पार करावे लागणार आहे. रस्त्यात जेवणाची, चहा- पाण्याची सोय नाही. सर्व दुकाने बंद आहेत, खिशात पैसा नाही आणि अनेकांसोबत लहान मुले आहेत.
राज्यात प्रवेशबंदी आहे. तरीही चालत निघालेल्या या लोंढ्यांना रोखणे, थांबवून ठेवणे पोलिसांना अशक्य झाले आहे. हजारो लोक एकत्र निघाल्याने संसर्गाचीही भीती आहे; पण शहरांत रोजगार व जेवणखाण नसल्याने त्यांना घरी जाण्याची आस आहे. शहरांकडून गावांकडे निघालेले हे लोंढे केवळ सरकारपुढील नव्हे; तर संसर्ग रोखण्यामधीलही खूप मोठे आव्हान आहे. शहरांतील साथ त्यांच्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागांत पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे.
साथ शहरांमधून ग्रामीण भागांमध्ये पोहोचून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, हाही सध्या लागू असलेल्या देशव्यापी ‘लॉकडाऊन’चा एक प्रमुख उद्देश असल्याने मूळ गावांकडे पायी निघालेले हजारो स्थलांतरित मजूर व असंघटित कामगारांचे लोंढे राज्यांनी आहेत तेथेच थोपवावेत व त्यांच्या राहण्या-जेवणाची सोय करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना दिली आहे.
रोजगार नसल्याने शहरांत गुजराण करणे मुश्कील झाल्याने हजारो आंतरराज्य व राज्यांतर्गत स्थलांतरित मजुरांचे तांडे मुला-बाळांसह शेकडो कि.मी. चालत आपापल्या मूळ राज्यात किंवा गावाकडे निघाल्याच्या आणि त्यांच्या हालअपेष्टांच्या बातम्या गेले तीन दिवस देशाच्या अनेक भागांतून आल्या होत्या.
ट्रकच्या कंटेनरमध्ये बसून राजस्थानकडे निघालेल्या सुमारे ३०० मजुरांना यवतमाळ जिल्ह्यात थांबविण्यात आले होते. अशाच प्रकारे पालघर जिल्ह्यातील तलासरी येथून राष्ट्रीय महामार्गावरून चालत निघालेला सुमारे एक हजार मजुरांचा तांडा शुक्रवारी रात्री पोलिसांनी गुजरात सीमेवर रोखला आहे.
एका टेम्पोने रस्त्याने गावाकडे निघालेल्या लोकांना शनिवारी सकाळी धडक दिली. त्यात पाच जण मरण पावले. अशाच एका अपघातात तेलंगणातील सात मजूर कर्नाटकात ठार झाले. केरळ, आंध्र प्रदेश व तेलंगणातून बिहार व उत्तर प्रदेशकडे निघालेल्या अशाच स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबांना त्या-त्या राज्यांच्या सीमांवर थांबविण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी रात्री राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ बैठक घेऊन त्यांनाही मजूर व असंघटित कामगारांचे हे स्थलांतर थांबविण्याचा आग्रह केला, तसेच ‘लॉकडाऊन’च्या काळात जीवनावश्यक वस्तू व औषधांचा कुठेही तुटवडा भासणार नाही, यासाठी योजायच्या उपायांचाही आढावा घेण्यात आला.
विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू ठेवा
शिक्षणसंस्थांमध्ये शिकणाऱ्या परगावच्या व परराज्यांतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी वसतिगृहे, हॉस्टेल व मेस सुरू राहतील याची दक्षता घेण्यासही राज्यांना सांगण्यात आले आहे.च्आपल्या गावाकडे चाललेल्या या लोकांशी चांगले वागा, त्यांच्यावर लाठ्या उगारू नका, जमल्यास त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करा, असे सर्व राज्य सरकारांनी पोलिसांना सांगितले आहे. च्टोल नाक्यांवर अशा लोकांच्या जेवणाची व्यवस्था करा, असे भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संबंधितांना सांगितले आहे.