"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 18:11 IST2024-10-23T18:10:49+5:302024-10-23T18:11:48+5:30
सीमाची गोष्ट समाजातील अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना आर्थिक अडचणींमुळे आपली स्वप्नं सोडावी लागतात.

"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील सीमा कुमारी हिने माणसामध्ये खरी जिद्द आणि संघर्ष करून कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची इच्छा असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य होतात हे सिद्ध केलं आहे. गवंडी म्हणून काम करणाऱ्या वडिलांसोबत गरिबीशी लढा देत सीमाने तिची स्वप्नं साकार केली आणि ती तिच्या गावातील पहिली पोलीस अधिकारी बनली.
सीमाची गोष्ट समाजातील अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना आर्थिक अडचणींमुळे आपली स्वप्नं सोडावी लागतात. वडिलांनी २०० रुपये प्रतिदिन मजुरी करून मुलीला शिक्षण दिलं आहे. मुलीला शिकवत असताना गावातील लोक त्यांना टोमणे मारायचे. मुलीला शिकवलंस तर जास्त शिकलेला, सुशिक्षित नवरा कुठून आणणार? असं लोक म्हणायचे. पण शिक्षण आणि वडिलांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच सीमा पोलीस अधिकारी झाली आहे.
सीमाचा आतापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. २०२१ मध्ये त्यांनी बिहार पोलिसात हवालदार म्हणून काम केलं, परंतु तिचं उद्दिष्ट यापेक्षा खूप मोठं होतं. ड्युटी संपल्यावर रात्रभर अभ्यास करायची आणि दिवसभर काम करताना सोबत पुस्तकं असायची. तिला सुरुवातीला अपयश आलं पण ती हिंमत हारली नाही. संघर्ष आणि मेहनतीच्या बळावर तिने अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केलं.
सीमाच्या वडिलांनी दिला खूप मदत केली. गवंडी म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. लोकांनी त्यांना टोमणे मारले तरी त्यांनी हार मानली नाही. सीमाचं शिक्षण हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. आता सीमा अधिकारी झाल्यावर वडिलांनी अभिमानाने माझं स्वप्न पूर्ण झालं असं म्हटलं आहे.