श्रीश्रींच्या संस्कृती महोत्सवामुळे जैव विविधतेची हानी

By admin | Published: August 18, 2016 05:34 AM2016-08-18T05:34:39+5:302016-08-18T05:34:39+5:30

आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या जागतिक संस्कृती महोत्सवामुळे संपूर्ण पूरक्षेत्र उद्ध्वस्त होऊन जैवविविधतेची अपरिमित हानी झाली असून, ती कदाचित कधीही भरून निघू शकणार नाही

Lack of biodiversity due to Shree Shree Sanskriti Mahotsava | श्रीश्रींच्या संस्कृती महोत्सवामुळे जैव विविधतेची हानी

श्रीश्रींच्या संस्कृती महोत्सवामुळे जैव विविधतेची हानी

Next

नवी दिल्ली : आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या जागतिक संस्कृती महोत्सवामुळे संपूर्ण पूरक्षेत्र उद्ध्वस्त होऊन जैवविविधतेची अपरिमित हानी झाली असून, ती कदाचित कधीही भरून निघू शकणार नाही, असा निष्कर्ष राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने काढला आहे. हा निष्कर्ष प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर आणि आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशन या संस्थेसाठी धक्का मानला जात आहे.
आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनने यमुनेच्या काठावर मार्च महिन्यात जागतिक संस्कृती महोत्सव घेतला होता. या महोत्सवामुळे पर्यावरणाची हानी झाली काय याचा अभ्यास करण्यासाठी एनजीटीने जलस्रोत मंत्रालयाचे सचिव शशी शेखर यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना केली होेती. या समितीने आपला अहवाल नुकताच एनजीटीच्या सुपूर्द केला. या अहवालात म्हटले आहे की, कार्यक्रमाचे मुख्य स्थळ म्हणून वापर करण्यात आलेले पूरक्षेत्र (यमुना नदीच्या उजव्या तीरावरील डीएनडी उड्डाणपूल ते बारापुल्ला ड्रेनदरम्यानचा भाग) पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सपाटीकरणासह पूरक्षेत्राची दबाई करण्यात आल्यामुळे जल संचयासाठी जागा उरली नाही. अनेक वनस्पती आणि झाडेझुडपेही नाहीशी होऊन जैवविविधतेचा ऱ्हास झाला आहे.
द आर्ट आॅफ लिव्हिंगने हा अहवाल फेटाळला असून, पर्यावरण हानीचे आरोप अवैज्ञानिक, पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. आपण समितीच्या पुनर्स्थापनेची मागणी केली असून, एनजीटीने आपल्या अर्जावर अद्याप सुनावणी केलेली नाही, असेही या संस्थेने म्हटले. एनजीटी याबाबत २८ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी करणार आहे.
पर्यावरणीय हानीच्या भरपाईसाठी एनजीटीने गेल्या मार्चमध्ये द आर्ट आॅफ लिव्हिंगला पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावून आणखी नुकसान होऊ न देण्याचे शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले
होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

आधीच झाला होता वाद
३५ लाख लोक सहभागी झालेल्या या महाकार्यक्रमासाठी सात एकरचा मंच उभारण्यात आला होता. तात्पुरत्या बांधकामामुळे जैवविविधतेची अपरिमित हानी होऊ शकेल, असे एनजीटीने म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांनी पाठ फिरवली.

Web Title: Lack of biodiversity due to Shree Shree Sanskriti Mahotsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.