माळेगाव यात्रेत नियोजनाचा अभाव
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:16+5:302014-12-20T22:27:16+5:30
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत नियोजनाचा अभाव असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. कालपर्यंत येथे पाण्याची व्यवस्था नसल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
Next
श रीक्षेत्र माळेगाव यात्रेत नियोजनाचा अभाव असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. कालपर्यंत येथे पाण्याची व्यवस्था नसल्याचे व्यापार्यांनी सांगितले. माळेगाव यात्रेस शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. यात्रेचे नियोजन महिनाभरापासून केले जात असले तरी आज प्रत्यक्षात यात्रेला सुरुवात झाली असताना भाविकांना सुविधा पुरविण्यात प्रशासन अपयशीच ठरल्याचे दिसून आले. माळेगाव यात्रेतील घोडेबाजार हा देशभरात प्रसिद्ध आहे. या घोड्यांच्या रपेटीसाठी असलेल्या यावर्षी मैदानाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. दरवर्षी येथे थोडा का होईना मुरुम टाकला जातो. मात्र यंदा एक टोपलेही टाकले नसल्याची बाब आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी जि.प.चे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचवेळी पाणी पुरवठाही होत नसल्याने पशुपालकांमध्ये ओरड असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे पाणी पुरवठा विभागाने मात्र येथे १० टँकर सुरू आहेत. तसेच येथे असलेल्या जलकुंभाद्वारे भाविकांना पाणी पुरविले जात असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेने यंदा भाविकांच्या सोयीसाठी फिरते शौचालय आणण्याचा निर्णय घेतला आहे मात्र प्रत्यक्षात हे शौचालय पहिल्या दिवशी उपलब्ध झालेच नव्हते. दुसरीकडे येथे असलेले तीन सार्वजनिक शौचालय कुलूप बंदच आहेत. त्यामुळे फिरत्या शौचालयासाठी १० लाख रुपये जिल्हा परिषद खर्च का करत असावे? हा प्रश्न पुढे आला आहे. माळेगावातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजीही अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे बांधकाम विभागाला दिलेल्या १४ लाखांचे नेमके काय झाले असावे? असा प्रश्न भाविक उपस्थित करत आहेत. एकीकडे लावण्यावर लाखो रुपये उधळणार्या जिल्हा परिषदेला भाविकांच्या मुुलभूत सोयी-सुविधांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे दिसून येत आहे.