उणे ४० डिग्रीमध्ये उपोषण, मोदीजी वाचलो तर भेटू! ‘थ्री इडियट्स’चे रिअल रँचो करणार पाच दिवसांचे उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 06:21 AM2023-01-24T06:21:50+5:302023-01-24T06:22:34+5:30
लडाखच्या दुर्गतीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी समाजसुधारक सोनम वांगचूक २६ जानेवारीपासून पाच दिवस उपोषण करणार आहेत.
लेह :
लडाखच्या दुर्गतीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी समाजसुधारक सोनम वांगचूक २६ जानेवारीपासून पाच दिवस उपोषण करणार आहेत. ते उणे ४० अंश तापमान असलेल्या खार्दुंगला येथे उपोषण करतील. त्यांनी याला क्लायमेट फास्ट म्हटले आहे.
संरक्षणात्मक पावले न उचलल्यास लेह-लडाखमधील दोनतृतीयांश हिमनद्या नष्ट होतील, असे काश्मीर विद्यापीठ व इतर संस्थांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर सोनम यांनी पंतप्रधानांना लडाख वाचविण्याची हाक घातली आहे.
त्वरेने पावले उचला
- लडाख व इतर हिमालयीन प्रदेशांना औद्योगिक शोषणापासून वाचवा. कारण, याचा येथील लोकांच्या जीवनावर परिणाम होईल. याकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी मी उपोषण करत आहे.
- यातून जिवंत राहिलो तर तुम्हाला पुन्हा भेटेन, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे लडाखबाबत त्वरेने पावले उचलण्याची मागणी केली आहे.
वांगचूक यांनी स्वतःच्या घरावर केले आंदोलनाचे प्रात्यक्षिक
‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट सोनम यांच्या जीवनावर आहे. त्यांनी पंतप्रधानांसाठी एक व्हिडीओ जारी केला आहे. यात ते लडाखमधील आदिवासी, उद्योग व हिमनद्यांबद्दल बोलत आहेत.