लादेन, वनी, हाफिज सईदच्या पंक्तीत केजरीवाल? सुरतमध्ये झळकली पोस्टर्स
By admin | Published: October 14, 2016 11:24 AM2016-10-14T11:24:49+5:302016-10-14T12:11:11+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'पाकिस्तानचा हिरो' असा उल्लेख असलेले पोस्टर सुरतमध्ये लावण्यात आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
सुरत, दि. 14 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'पाकिस्तानचा हिरो' असा उल्लेख असलेले पोस्टर सुरतमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले होते. विशेष म्हणजे, या पोस्टरमध्ये काश्मीरमध्ये मारला गेलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहानी वनी, जैश-ए-मुहम्मदचा प्रमुख हाफिज सईद आणि ओसामा बिन लादेन यांचा समावेश आहे. या तिघांच्या पंक्तीत केजरीवाल यांना स्थान देण्यात आले आहे.
16 ऑक्टोबर रोजी अरविंद केजरीवाल यांची सुरतमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे ही सभा होऊ न देण्याच्या उद्देशाने भाजपानेच हे पोस्टर लावले, असा आरोप सुरतमधील 'आप'चे प्रवक्ते योगेश जादवानी यांनी केला आहे. मात्र भाजपाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, केजरीवाल यांचे आक्षेपार्ह पोस्टर लावल्याची माहिती मिळताच 'आप'ने हे पोस्टर काढले. शहरातील आठ बॅनर्स काढण्यात आल्याचे जादवानी यांनी सांगितले.
16 ऑक्टोबर रोजी केजरीवाल शहरातील योगी चौकात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला जवळपास 1 लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज जादवानी यांनी व्यक्त केला आहे. केजरीवाल यांच्यासोबत आपचे नेेते कुमार विश्वास आणि संजय सिंहदेखील असणार आहेत. या सभेनंतर केजरीवाल अहमदाबाद आणि सुरतमधील संयोजकांना भेटणार आहेत. तर दुस-या दिवशी ते विविध संघटनांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, सुरतचे भाजपाचे शहराध्यक्ष नितीन भाजियावाला यांनी, पक्षातील कार्यकर्त्यांना केजरीवाल यांच्या सभेला विरोध न करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले आहे. तसेच केजरीवाल यांचे आक्षेपार्ह फोटो भाजपा कार्यकर्त्यांनी लावल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आप असे डाव आखत असून दुसरीकडे भाजपाला बदनाम करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.