केंद्रीय मंत्र्याचा मुलगा आशिष मिश्रा आत्मसमर्पण कधी करणार? समोर आली मोठी माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 03:30 PM2021-10-08T15:30:39+5:302021-10-08T15:35:01+5:30
Lakhimpur Violence: केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.
लखीमपूर खेरी: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी कार्यालयात येण्यास सांगितले होते. पण, अजूनपर्यंत आशिष मिश्रा किंवा त्यांचे वकीलही गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झालेले नाहीत.
रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशिषला शुक्रवारी सकाळी 10 वाजता गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल होण्यास सांगितले होते. यासंदर्भातील नोटीसही त्याच्या निवासस्थानाबाहेर चिकटवण्यात आली. तसेच, या प्रकरणाच्या तपास पथकाचे नेतृत्व करणारे पोलिस उपमहानिरीक्षक उपेंद्र अग्रवालही वेळेवर कार्यालयात पोहोचले. पण, आशिष कार्यालयात आलाच नाही.
उद्या पोलिसांना शरण येण्याची शक्यता
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा रात्री उशिरापर्यंत लखीमपूर खेरीला पोहोचतील आणि त्यानंतर ते उद्या पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाला सादर करतील. त्यामुळे आशिष मिश्रा उद्या म्हणजेच शनिवारी पोलिसांसमोर हजर होऊ शकतात. दरम्यान, आशिष मिश्रा नेपाळला पळून गेल्याच्या काही बातम्या सकाळी माध्यमांमध्ये दाखवण्यात आल्या होत्या, पण याची अधिकृतपणे अद्याप पुष्टी झालेली नाही.