Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खीरी हिंसाचाराचा थरारक व्हिडीओ; शेतकऱ्यांना चिरडल्याचं पाहून संताप येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 10:09 AM2021-10-05T10:09:45+5:302021-10-05T10:10:15+5:30

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत शेतकऱ्यांना चिरडताना दिसत आहे. २७ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Lakhimpur Kheri Violence: Lakhimpur Kheri Viral Video A Jeep Ran Over On Protesting Farmers | Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खीरी हिंसाचाराचा थरारक व्हिडीओ; शेतकऱ्यांना चिरडल्याचं पाहून संताप येईल

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खीरी हिंसाचाराचा थरारक व्हिडीओ; शेतकऱ्यांना चिरडल्याचं पाहून संताप येईल

googlenewsNext

लखीमपूर खीरी – शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी झालेल्या हिंसक घडामोडीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. निदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागून आलेल्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं. सध्या पोलीस या व्हिडीओची पुष्टी करत नाहीत. व्हिडीओत शेतकऱ्यांना चिरडणारी पहिली गाडी थार जीप आहे तर दुसरी टोयाटो फॉर्च्युनर होती. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह विरोधकांनी हा व्हिडीओ शेअर करत सरकारवर प्रश्नचिन्ह उभं केले आहे.

काँग्रेसच्या प्रियंका गांधी(Congress Priyanka Gandhi) म्हणाल्या की, नरेंद्र मोदी, तुमचं सरकार कुठल्याही ऑर्डरविना आणि एफआयआरशिवाय मला मागील २८ तासांपासून ताब्यात घेतलं आहे. अन्नदाता शेतकऱ्याला चिरडणाऱ्या व्यक्तीला आतापर्यंत अटक झाली नाही. असं का? असं सवाल त्यांनी विचारला आहे. तर आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी या व्हिडीओनंतरही आणखी पुरावा लागेल का? सत्तेच्या अहंकारात गुंडांनी शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार केले तेव्हा काहीजण मंत्र्याचा मुलगा जीव वाचवण्यासाठी पळत होता असं ज्ञान पाजळत आहेत अशी टीका त्यांनी केली.

क्रूर लोकांवर कठोर कारवाई व्हावी

माजी काँग्रेस नेते ललितेशपति त्रिपाठी यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत ट्विट केलंय की, ज्यांना लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराचा पुरावा हवाय त्यांनी हा पुरावा घ्यावा. या क्रूर लोकांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा असं कृत्य करण्याचं धाडस कुणी करू नये.

काय आहे या व्हिडीओत?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत शेतकऱ्यांना चिरडताना दिसत आहे. २७ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात काही शेतकरी काळे झेंडे घेऊन रस्त्याने चालताना दिसत आहेत. इतक्यात पाठीमागून येणाऱ्या जीपने शेतकऱ्यांना चिरडले तर त्यानंतरही आणखी एक कार शेतकऱ्याच्या दिशेने आली. या घटनेत ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. लखीमपूर खीरी हिंसाचार घटनेत योगी सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावर मी आणि माझा मुलगा नव्हतोच असा दावा त्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात भाजपाला फटका बसण्याची शक्यता

लखीमपूर येथे रविवारी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकरी आंदोलनामुळे पश्चिम उत्तर प्रदेश आधीच भाजपसाठी आव्हान बनला आहे. चार महिन्यांनंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजकीय गणित बिघडू शकते. राज्यातील राजकारणाचे निरीक्षक वरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ कलहंस यांच्या म्हणण्यानुसार लखीमपूर खीरी घटनेत थेटपणे भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचे नाव जोडले जात आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आधीच नाराज होते. भाजप या घटनेनंतर बॅकफूटवर असून पक्षाच्या एका प्रमुख प्रवक्त्याने काहीही भाष्य करण्यास नकार देत म्हटले की, या प्रकरणी उत्तर प्रदेश शाखा बोलेल. राज्यातील भाजपच्या सह निवडणूक प्रभारी सरोज पांडे यांनी काँग्रेस आणि विशेषत: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली. गांधी यांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी विचारले की, “तुम्ही मृतदेहांचे राजकारण करणे कधी सोडणार आहात? अशी टीका केली आहे.

Web Title: Lakhimpur Kheri Violence: Lakhimpur Kheri Viral Video A Jeep Ran Over On Protesting Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.