Lakhimpur Kheri Violence: कायदेमंत्र्यांची घोषणा, हिंसाचारात ठार झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना शहीदाचा दर्जा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 12:00 IST2021-10-14T11:59:24+5:302021-10-14T12:00:09+5:30
Lakhimpur Kheri Violence: उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रिजेश पाठक यांनी हिंसाचारात मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्ते शुभम मिश्रा आणि हरी ओम मिश्रा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Lakhimpur Kheri Violence: कायदेमंत्र्यांची घोषणा, हिंसाचारात ठार झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना शहीदाचा दर्जा
लखीमपूर खेरी:उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांसह भाजप कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशचे कायदामंत्री ब्रजेश पाठक यांनी बुधवारी मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांपैकी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या वाहनाचे चालक हरी ओम मिश्रा आणि भाजपचे विभागीय मंत्री शुभम मिश्रा यांच्या कुटुंबाची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी कुटुंबियांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, ब्रजेश पाठक लखीमपूरच्या हिंसाचारात ठार झालेल्या जिल्ह्यातील इतर 4 जणांच्या नातेवाईकांना भेटले नाहीत. त्यात भाजपचे कार्यकर्ते श्याम सुंदर निषाद आणि पत्रकार रमण कश्यप याशिवाय नचतार सिंग आणि लव्हप्रीत सिंग या दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे. या घटनेत ठार झालेले अन्य दोन शेतकरी गुरविंदर सिंग आणि दिलजीत सिंग हे बहराइच जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
भाजपमध्ये शहीदचा दर्जा
ब्रजेश पाठक म्हणाले की, शुभम मिश्रा उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना घेण्यासाठी जात होते. पण, त्यापूर्वीच हिंसाचारात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ब्रजेश पाठक यांनी मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पक्षात शहीदचा दर्जा मिळेल असे सांगितले आहे. तसेच, प्रकरणाची कारवाई होत असून, दोषींची गय केली जाणार नाही, त्यांना लवकरच अटक होईल, असे आश्वासन पीडितांच्या कुटुंबियांना दिले.
परिस्थिती सामान्य झाल्यावर इतरांना भेटणार
यावेळी माध्यमांनी ब्रजेश यांना इतर पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, भाजप कार्यकर्ते श्याम सुंदर निषाद आणि पत्रकार रमण कश्यप यांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहे. पण, त्यांची घरे घटनास्थळाच्या जवळच असल्यामुळे परिस्थिती सामान्य झाल्यावर त्यांची भेट घेईल.