Lakhimpur Kheri Violence: मुलगा कोठडीत; अजय मिश्रा यांचे मंत्रिपद धोक्यात, राजीनाम्यासाठी दबाव, राज्यातील भाजप नेते दिल्लीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 07:29 AM2021-10-12T07:29:39+5:302021-10-12T07:47:21+5:30
Lakhimpur Kheri Violence: उत्तर प्रदेशातील घटनांमुळे भाजपची केंद्रीय नेतृत्वाची चिंता वाढली आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील घटनांमुळे भाजपची केंद्रीय नेतृत्वाची चिंता वाढली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने चिरडण्यात आले, त्यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष यांना अटक झाली आहे, ते पोलीस कोठडीत आहेत. पण, हे प्रकरण अधिक वाढण्याची भीती भाजप नेत्यांना वाटत असून, त्यामुळे अजय मिश्रा यांचेही राज्यमंत्रिपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना वाहनांनी चिरडण्यात आले, त्या ६४ मिनिटांच्या काळात आपण कुठे होतो, याचा खुलासा आशिष मिश्रा यांना करता आला नाही. त्याने पोलिसांना काही व्हिडिओ सादर केले. पण त्यातूनही आपण वाहनांत वा त्या ठिकाणी नव्हतो, असे आशिषला सिद्ध करता आले नाही. त्यामुळेच त्याला अटक झाली. त्याला अटक झाल्यापासून भाजप नेत्यांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यापासून दूर राहण्याचे ठरविले आहे. एवढेच नव्हे, तर उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी नेतागिरीचा अर्थ फॉरच्युनरखाली लोकांना चिरडणे, त्यांना लुबाडणे असा होत नाही, तुम्ही कसे वागता, हे पाहूनच लोक तुम्हाला मते देतात, असे भाजप कार्यकर्त्यांच्या सभेत दाखवले. त्यांचा रोख अजय मिश्रा यांच्याकडेच होता.
केंद्रीय नेतृत्वाच्या पाठिंब्यामुळेच स्वतंत्र देव सिंह असे बोलले आहेत, असे उत्तर प्रदेशातील भाजप नेत्यांना वाटत आहे. ते सोमवारी दुपारी दिल्लीत नेत्यांना भेटायला आले आहेत. त्यांच्यासमवेत संघटन सचिव सुनील बन्सल व प्रभारी राधामोहन सिंह हेही आहेत. विरोधी पक्ष सातत्याने अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असून, त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्यामुळे मिश्रा यांच्यावर कारवाई करावी, असा प्रदेश भाजपच्या नेत्यांचा आग्रह आहे.
योगी अनुकूल?
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही अजय मिश्रा यांच्यावर कारवाई व्हावी, अशा मताचे असल्याचे समजते.
- योगींना पुढील वर्षीच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे ते केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा वा त्यांचा मुलगा आशिष यांचे समर्थन करणार नाहीत वा आशिषच्या सुटकेसाठी प्रयत्नही केला
जाणार नाही.
- निवडणूक वर्षात आरोपींची बाजू घेणे योगींनाही परवडणारे नाही.
प्रियांका गांधींची आक्रमक मागणी, देशव्यापी माैनव्रत आंदाेलन
लखनाै : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी हाेत नाही, ताेपर्यंत गप्प बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका काँग्रेसच्या नेत्या व सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी घेतली आहे.
लखीमपूर खेरी प्रकरणावरून त्यांनी लखनाैमध्ये माैनव्रत आंदाेलन केले. प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी माैनव्रत आंदाेलन करण्यात आले. त्यात प्रियांका गांधी यांच्यासह सर्व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तीन तास माैन धारण करून केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला.
देशभरातून काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आपापल्या राज्यांमधून या आंदाेलनात सहभागी झाले हाेते. लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेवरून प्रियांका गांधी यांनी अतिशय आक्रमकपणे केंद्र सरकारचा विराेध सुरू केला आहे.
आशिष मिश्रा याला तीन दिवसांची पोलीस कोठडी
लखनौ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेला केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष मिश्रा याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लखीमपूर खेरी येथे ३ ऑक्टोबर रोजी शेतकरी आंदोलकांच्या अंगावर वाहने घातल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले होते. हा हिंसाचार घडविण्यात आशिष मिश्रा याचा हात असल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांनी केला व त्याला अटक करण्याची मागणी केली होती. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनाही त्या पदावरून दूर हटवावे, असे शेतकरी आंदोलकांनी म्हटले होते.
आशिष मिश्रा याला शनिवारी रात्री अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता आशिषला न्यायालयाने उद्यापासून ते शुक्रवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा पोलीस रिमांड शुक्रवारी सकाळी संपुष्टात येईल. (वृत्तसंस्था)