शेतकऱ्यांचा मारेकरी चार महिन्यांत बाहेर अन् अल्पवयीन नवी नवरी १९ महिने आत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 05:54 AM2022-02-20T05:54:38+5:302022-02-20T05:55:42+5:30
आशिष मिश्रा व खुशी दुबे यांची उत्तर प्रदेशात घरोघरी तुलना
श्रीमंत माने
लखनौ : तसा त्या दोघांचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी थेट संबंध नाही. दोघेही रिंगणात नाहीत. परंतु, प्रत्येकाच्या तोंडी दोघांचे नाव आहे. दोघेही राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा समाजघटक असलेल्या ब्राह्मण समाजाचे. दोघांच्या तुरूंगवारीची व जामिनाची तुलना केली जात आहे. किंबहुना विधानसभा निवडणुकीचे पारडेदेखील या तुलनेवर फिरू शकेल.
आशिष मिश्राची जामिनावर सुटका झाल्यानंतर गेले १९ महिने सुधारगृहात कैद असलेल्याा खुशीचे नाव घराघरात चर्चेत आले आहे. पोलिसांची कार्यपद्धतीसोबतच कायद्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चार शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारणारा जामिनावर बाहेर आणि जिचा बिकरू कांडाशी काहीही संबंध नाही अशी खुशी मात्र आत, हा कसला न्याय, हा कसला सरकारचा कारभार, असा सवाल राजकीय वर्तुळातही चर्चेत आहे. विशेषत: काँग्रेस व बहुजन समाज पक्षाकडून या मुद्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भारतीय जनता पक्षावर जाहीर टीका केली जात आहे.
लखीमपूर खिरी येथे ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवून पाचजणांना चिरडून मारण्याचा आरोप आशिष मिश्रावर आहे. त्यांना अटक करण्यात आली. मात्र अलाहाबाद कोर्टाने एफआयआरमध्ये असलेल्या तांत्रिक मुद्यावर जामीन दिला. ४ दिवसापूर्वी तो बाहेर आला.
जुलै २०२० मधील बहुचर्चित विकास दुबे प्रकरणात मारल्या गेलेल्या अमर दुबे याची ती नवपरिणत पत्नी. अमर व खुशीचे लग्न २९ जून २०२० ला झाले. ३० जूनला ती सासरी आली आणि २ जुलैच्या रात्री कानपूर जिल्ह्यातील बिकरू गावात गँगस्टर विकास दुबे व त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिस उपअधीक्षक देंवेंद्र कुमार मिश्रा यांच्यासह अधिकारी-कर्मचारी मिळून आठ पोलिसांची हत्या केली.