लखीमपूरनंतर हरियाणामध्ये भाजप खासदाराने शेतकऱ्याला गाडीखाली चिरडलं, आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 03:01 PM2021-10-07T15:01:49+5:302021-10-07T15:02:13+5:30
कुरुक्षेत्र मतदारसंघाचे भाजप खासदार नायब सैनी यांच्या वाहनाने कथितरित्या एका आंदोलक शेतकऱ्याला चिरडल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कथितरित्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या गाडीने चिरडल्याची घटना घडली होती. त्या घटनेत काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यातच आता हरियाणामध्येही अशाच प्रकारची घटना घडल्याची माहती समोर आली आहे.
हरियाणातील भाजप खासदार नायब सैनी यांच्या कारने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला, त्यात एक शेतकरी जखमी झाला, असा आरोप हरियाणातील आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेतील जखमी शेतकऱ्याला अंबालाजवळील नारायणगड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, कुरुक्षेत्रचे भाजप खासदार नायब सैनी त्यांच्या इतर काही कार्यकर्त्यांसोबत कोविड-19शी मुकाबला करणाऱ्या वैद्यकीय आणि फ्रंट लाइन कामगारांचा सत्कार करण्यासाठी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अंबाला येथे गेले होते. सैनी यांच्या भेटीच्या निषेधार्थ शेतकरी तेथे जमले. कार्यक्रम संपला आणि गाड्यांचा ताफा परिसरातून बाहेर पडू लागला तेव्हा एका वाहनांने शेतकऱ्याला कथितरीत्या धडक दिली. या घटनेत तो शेतकरी जखमी झाला.