Lakhimpur Violence: लखीमपूर प्रकरणातील आरोपी, गृहमंत्र्यांचा मुलगा नेपाळला पळून गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 04:17 PM2021-10-08T16:17:29+5:302021-10-08T17:03:54+5:30
Lakhimpur Violence: लखीमपूर खेरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशिष मिश्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी कार्यालयात येण्यास सांगितले होते. पण, अजूनपर्यंत आशिष मिश्रा किंवा त्यांचे वकीलही गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झालेले नाहीत. तर, आशिष मिश्राला अद्यापही अटक करण्यात न आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. आता, आम आदमी पक्षाच्या आमदाराने केलेलं ट्विट चांगलेच चर्चेत आलं आहे.
लखीमपूर खेरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशिष मिश्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, त्यास शुक्रवारी सकाळी 10 वाजता गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल होण्यास सांगितले होते. यासंदर्भातील नोटीसही त्याच्या निवासस्थानाबाहेर चिकटवण्यात आली. तसेच, या प्रकरणाच्या तपास पथकाचे नेतृत्व करणारे पोलीस उपमहानिरीक्षक उपेंद्र अग्रवालही वेळेवर कार्यालयात पोहोचले. पण, आशिष कार्यालयात आलाच नाही. त्यामुळे, आशिषला अद्याप अटक का नाही, असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे.
आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बालयान यांनी एक ट्विट करुन, गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्र हा नेपाळला पळून गेल्याचं सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे नरेश बालयान यांचं हे ट्विट गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांनी रिट्विट केलं आहे. बालयान यांनी हेही ट्विट करुन सांगितलंय. त्यामुळे, या ट्विटचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच, आशिष मिश्र खरंच नेपाळला पळून गेलाय का, असा प्रश्न अनेकांन पडला आहे. दरम्यान, आपल्या ट्विटमध्ये बालयान यांनी, अजय मिश्र यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे. अजय मिश्र हे डिझेल आणि चंदनाच्या लाकडाची तस्करी करत होते, जर असा बाप गृहराज्यमंत्री असेल. तर, पोरगा बलात्कारी, हत्यारा निघणारच.. असेही त्यांनी म्हटलं आहे.
मैंने ट्वीट किया कि @ajaymishrteni आपका आतंकी बेटा नेपाल भाग गया, जहाँ आप तस्करी किया करते थे डीजल और चंदन की लड़की का, मेरे बात से और अपने बेटे के कुकर्म से सहमत हो कर अजय मिश्रा ने रिट्वीट कर दिया। वो भी अपने कुकर्म और बेटे के कुकर्म से खुद ही सहमत है। रिट्वीट देखिये इनका। pic.twitter.com/6gQ6JuH6HK
— MLA Naresh Balyan (@AAPNareshBalyan) October 8, 2021
उद्या पोलिसांना शरण येण्याची शक्यता ?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा रात्री उशिरापर्यंत लखीमपूर खेरीला पोहोचतील आणि त्यानंतर ते उद्या पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाला सादर करतील. त्यामुळे आशिष मिश्रा उद्या म्हणजेच शनिवारी पोलिसांसमोर हजर होऊ शकतात. दरम्यान, आशिष मिश्रा नेपाळला पळून गेल्याच्या काही बातम्या सकाळी माध्यमांमध्ये दाखवण्यात आल्या होत्या, पण याची अधिकृतपणे अद्याप पुष्टी झालेली नाही.