अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे बॅंकेत सडले तब्बल ४२ लाख रूपये, कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 01:51 PM2022-09-16T13:51:48+5:302022-09-16T13:52:53+5:30
अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बॅंकेतील ४२ लाख रूपयांची रक्कम सडली आहे.
नवी दिल्ली : सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बॅंकेतील ४२ लाख रूपयांची रक्कम पावसाच्या ओलसरपणामुळे सडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे या नोटांची दुरावस्था होत असल्याची अधिकाऱ्यांना देखील माहिती नव्हती. ही बाब उघडकीस येताच चार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील कानपूरमधील पंजाब नॅशनल बँकेच्या पांडू नगर शाखेत करन्सी चेस्टमध्ये ठेवलेले लाखो रुपये सडले आहेत. अधिकाऱ्यांनी ही रक्कम लपवली होती मात्र जेव्हा जुलै महिन्याचे ऑडिट आरबीआयने केले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. यामध्ये पेट्यांमध्ये ठेवलेल्या ४२ लाख रुपयांच्या नोटा ओल्या झाल्याने सडल्याचे दिसून आले. या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ व्यवस्थापकासह चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यापैकी तीन अधिकारी असे आहेत जे काही दिवसांपूर्वीच पीएनबीच्या पांडू नगर शाखेत बदली होऊन आले आहेत.
आरबीआयच्या तपासणीत धक्कादायक बाब उघड
आरबीआयने २५ जुलै ते २९ जुलै या कालावधीत शाखेच्या चेस्ट करन्सीची तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. कारण यामध्ये जास्तीत जास्त १४ लाख ७४ हजार ५०० रूपये आणि किमान १० लाख रूपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय १० रूपयांच्या ७९ बंडल आणि २० रूपयांच्या ४९ बंडलचे नुकसान झाल्याची माहिती आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्यानंतर पुन्हा मोजणी केली असता ४२ लाख रूपयांच्या नोटा सडल्याचे निदर्शनास आले.
शाखा व्यवस्थापकाचे निलंबन
हे संपूर्ण प्रकरण गंभीर असल्यामुळे या कारवाईवर काही लोक आणि बँक कर्मचारी संघटनेचे नेतेही प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत आहेत. तर देवीशंकर हे वरिष्ठ व्यवस्थापक करन्सी चेस्ट असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ते २५ जुलै रोजी बदली होऊन या शाखेत आले आहेत मात्र नोटा सडण्याची ही घटना त्यापूर्वीची आहे. बॅंकेतील नोटांच्या पेट्या मोठ्या तिजोरीत ठेवल्या जात नव्हत्या आणि रोकड येते तेव्हा ती सतत पेटीत भरून चेस्ट करेंसी अंडर ग्राउंडमध्ये ढकलली जायची. त्यामुळे या नोटा सडलेल्या अवस्थेत मिळाल्या.