रिक्षाचालकाने घेतली लेकीसाठी लाखांची रायफल
By Admin | Published: August 28, 2016 12:32 AM2016-08-28T00:32:26+5:302016-08-28T00:32:26+5:30
राष्ट्रीय पातळीवर नेमबाजीची खेळाडू असलेल्या आपल्या लेकीसाठी येथील रिक्षाचालक पित्याने पाच लाख रुपयांची जर्मन बनावटीची रायफल विकत घेतली. तिच्या लग्नासाठी
अहमदाबाद : राष्ट्रीय पातळीवर नेमबाजीची खेळाडू असलेल्या आपल्या लेकीसाठी येथील रिक्षाचालक पित्याने पाच लाख रुपयांची जर्मन बनावटीची रायफल विकत घेतली. तिच्या लग्नासाठी त्याने हे पैसे जमविले होते. मणिलाल गोहिल असे या पित्याचे तर मित्तल हे मुलीचे नाव आहे.
मणिलाल आणि मित्तल हे दोघे रायफलचा परवाना घेण्यासाठी येथील पोलीस आयुक्तांकडे गेल्यावर ही बातमी उघड झाली. रिक्षाचालकाने एवढ्या मोठ्या रकमेची रायफल विकत घेतल्यावर अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. सुदैवाने पोलिसांनी या बापलेकीला आवश्यक तो परवाना मिळवून देण्यास मदत केली आणि मणिलाल यांच्या प्रयत्नांचे कौतुकही केले.
नेमबाजी (शूटिंग) हा माझा खर्चिक छंद जोपासण्यासाठी माझ्या आईबाबांनी खूप काही त्याग केला आहे. आता ही रायफल मिळाल्यामुळे मी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी खूप कष्ट करेन, असे मित्तल म्हणाली.
मित्तल आईवडील व दोन भावांसह येथील गोमतीपूर भागातील चाळीत राहते. ती गेल्या चार वर्षांपासून शूटिंगचा सराव करते. अहमदाबादेतील रायफल क्लबने तिला शूटिंगमध्ये उत्तीर्ण केल्यानंतर आणि काही नेमबाज सराव करताना बघून तिच्यात शूटिंगचे वेड शिरले. आपल्यालाही रायफल मिळाली पाहिजे याचा तिला ध्यास लागला. मणिलाल गोहिल यांच्या कुटुंबाचे चरितार्थाचे साधन केवळ रिक्षाच आहे. मित्तलचा एवढा खर्चिक छंद त्या कुटुंबाला झेपणारा नव्हता.
या पदकाने मित्तलचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. परंतु पुढील प्रशिक्षण व स्वत:ची नसलेली रायफल यामुळे तिच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या. तिचे वडील व तिचा मोठा भाऊ जैनिश हे दोघेही ५० मीटर रेंजची जर्मन बनावटीची रायफल विकत घेण्यासाठी पैशांची जमवाजमव करू लागले.
मित्तलच्या लग्नासाठी बाजुला काढून ठेवलेले पैसे रायफलसाठी वापरावे लागणार होते. एवढे पैसे रायफलवर खर्च करणे हे गोहिल कुटुंबासाठी कठीणच काम होते परंतु आता मित्तलला स्वत:ची रायफल उपलब्ध झाली असून ती येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकेल. (वृत्तसंस्था)
मिळवले कांस्य पदक
मणिलाल यांनी आपल्या मुलीला नेमबाजी सोडून दे असे म्हटले नाही. त्यांनी तिला रायफल क्लबमध्ये नेले आणि तेथे तिला भाड्याने गन उपलब्ध करून दिली. २०१३ मध्ये फारच कमी सराव असतानाही मित्तल ५७ व्या अखिल भारतीय राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाली आणि त्यात तिने कास्य पदक मिळविले. तिच्यासोबत होत्या अंजू शर्मा व लज्जा गोस्वामी या खेळाडू.