Lal Bahadur Shastri Jayanti: त्या रात्री काय झालं होतं, जाणून घ्या लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 11:13 AM2018-10-02T11:13:56+5:302018-10-02T11:14:07+5:30
खोलीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं की, पंतप्रधानांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली- वर्षं 1965मध्ये भारत पाकिस्तानमध्ये युद्ध संपून काहीच दिवस झाले होते. नवं वर्षं सुरू होणार होतं. खरं तर त्या दिवसांत दिल्लीत कडाक्याची थंडी होती. परंतु भारत-पाक सीमेवर दारूगोळ्याचा वास आणि गोळ्यांचा आवाज सर्वांच्या कानात घुमत होता. याच दोन्ही देशांमध्ये शांती वार्ता करण्याचं ठरलं आणि जागाही निश्चित झाली. चर्चेची जागा भारत आणि पाकिस्तानऐवजी ताशकंद निवडण्यात आली. तत्कालीन सोव्हिएत रशियांच्या अंतर्गत येणा-या ताशकंदमध्ये 10 जानेवारी 1966मध्ये भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांच्यात बैठक ठरली.
10 जानेवारी 1966ला पहाटे थंडी जरा जास्तच होती. खरं तर भारतीय मंत्रिमंडळाचा ही थंडी सोसण्याची सवय नव्हती. भेटीची वेळ पहिल्यापासूनच ठरलेली होती. लाल बहादूर शास्त्री आणि अयुब खान यांची भेट ठरलेल्या वेळेत झाली. चर्चा बराच वेळ सुरू राहिली आणि अखेर दोन्ही देशांमध्ये शांती करार करण्यावर एकमत झालं. त्यामुळे दोन्ही देशांकडून आलेलं प्रतिनिधीमंडळ खूश झालं. परंतु ती रात्र भारतासाठी काळरात्र ठरली. 10 ते 11 जानेवारीदरम्यान लाल बहादूर शास्त्रींची संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी या घटनेचा उल्लेख त्यांची आत्मकथा 'बियॉन्ड द लाइंस (Beyond the Lines)'मध्ये केला आहे.
ते लिहितात, मध्यरात्रीनंतर अचानक माझ्या रुमची बेल वाजली. दरवाज्यासमोर एक महिला उभी होती. ती म्हणाली की, तुमच्या पंतप्रधानांची परिस्थिती गंभीर आहे. मी धावत-पळतच त्यांच्या खोलीत गेलो. तोपर्यंत उशीर झाला होता. खोलीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं की, पंतप्रधानांचा मृत्यू झाला आहे. त्या ऐतिहासिक कराराच्या काही काळातच भारतासाठी सर्व परिस्थिती बदलली होती. दुस-या देशात लाल बहादूर शास्त्रींचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं भारतात शोकाकुल वातावरण होते.
लोक दुःखी होतेच, परंतु त्यापेक्षा जास्त हैराण होते. त्यानंतर लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागली. तसेच लाल बहादूर मृत्यूमागे संशय व्यक्त केला जाऊ लागला. विशेष म्हणजे लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूची प्रत्यक्षदर्शी असलेली त्यांची चिकित्सक आणि नोकर रामनाथ यांची रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर मृत्यूचं गूढ आणखी वाढलं. लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर सरकारनं राज नारायण समिती बनवली. या समितीनं तपास केला. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही, पुढे त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलंच नाही.