अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय - ललित मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 10:38 AM2018-09-14T10:38:50+5:302018-09-14T14:51:17+5:30
विजय माल्यानं केलेल्या त्या दाव्याच्या समर्थनार्थ ललित मोदीचं अरुण जेटली यांच्याविरोधात ट्विट
नवी दिल्ली - भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या मद्यसम्राट विजय माल्यानं फरार होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतल्याचे सांगून देशभरात खळबळ उडवून दिली. माल्याच्या या कथित माहितीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या वादात आता भारतातून फरार झालेल्या ललित मोदीनेही उडी घेतली आहे.
विजय माल्याने केलेल्या दाव्याचे समर्थन करत ललित मोदीनं ट्विट केले आहे. आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदीनं अरुण जेटली यांना खोटे बोलण्याची सवय असल्याचा आरोप करत त्यांची तुला सापासोबत केली आहे.
(खोटं बोलतोय तो, अर्थमंत्री अरुण जेटलींनी मल्ल्याचा दावा फेटाळला)
विजय माल्या आणि अरुण जेटली यांच्या कथित भेटीबाबत बोलताना त्यानं असंही म्हटले की, माल्यासोबत भेट झाल्याचे अनेकांना माहिती असतानाही जेटली ही बाब का नाकारत आहेत. अरुण जेटलींना खोटे बोलण्याची सवय आहे. एका सापाकडून आपण दुसऱ्या काय अपेक्षा ठेऊ शकतो, असे ट्विट मोदीनं केले आहे. आपल्या ट्विटमध्ये मोदीनं जेटलींना टॅगदेखील केले आहे.
माल्याचा खळबळजनक दावा
देश सोडण्यापूर्वी मी व्यवहारसंदर्भात सेटलमेंट करण्यासाठी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो. मात्र, बँकांनी माझ्या सेटलमेंट लेटरवर आक्षेप घेतला. त्यानंतर मी देश सोडण्याचा निर्णय घेतला, असे सांगत विजय माल्यानं खळबळ उडवून दिली.
#WATCH "I met the Finance Minister before I left, repeated my offer to settle with the banks", says Vijay Mallya outside London's Westminster Magistrates' Court pic.twitter.com/5wvLYItPQf
— ANI (@ANI) September 12, 2018
माल्या खोटं बोलतोय - जेटली
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्र जारी करुन माल्याचा दावा खोडून काढला. तसेच 2014 पासून आजपर्यंत मी माल्याला भेटीसाठी कधीही वेळ दिली नसल्याचे जेटलींनी स्पष्ट केले. माल्याचे वक्तव्य धादांत खोटे आहे. माल्याकडे राज्यसभेचं सदस्यत्व आहे. त्यामुळे अनावधानाने त्यांची आणि माझी भेट झाली होती. खासदार असल्यामुळे माल्या सभागृहात हजर राहत होते. एकदा मी माझ्या बंगल्याबाहेरुन रुममध्ये जात होतो. त्यावेळी माल्याची आणि माझी अनावधानाने भेट झाली होती. त्याच भेटीचा गैरफायदा घेत मल्ल्याने अत्यंत खोटे विधान केल्याचे अरुण जेटली यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
कोण आहे ललित मोदी?
भारतात इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना ललित मोदी याने आणली. अल्पावधीतच या लीगने प्रसिद्धी व प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्याचबरोबर लीगमधील अनेक गैरव्यवरहारही समोर आले आणि त्यात ललित मोदीचा हात असल्याचे उघड झाले. 2013 मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी आणली आणि त्यानंतर त्यानं लंडनमध्ये पळ काढला.
The denial by @arunjaitley whether he met @TheVijayMallya just before he left is completely #true. Let him just accept he did. Why such a #denial when a lot of people know he met and who else was present. @arunjaitley it’s become a #habit to #lie. What else can u #expect from a🐍 pic.twitter.com/bq5BDImaqF
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) September 13, 2018