Lalit Modi: ४ हजार ५५५ कोटी रुपयांची संपत्ती, वादविवाद, अखेर ललित मोदींनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 09:10 PM2023-01-15T21:10:01+5:302023-01-15T21:11:18+5:30
Lalit Modi: आयपीएलचे माजी आयुक्त आणि उद्योगपती ललित मोदी हे गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारपणादरम्यान ललित मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
आयपीएलचे माजी आयुक्त आणि उद्योगपती ललित मोदी हे गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना गेल्या दोन आठवड्यात दोन वेळा कोरोना विषाणूच्या संसर्गासह इन्फ्लूएंझा आणि निमोनिया झाला होता. या आजारपणादरम्यान ललित मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ललित मोदी यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याचं नाव जाहीर केलं आहे.
व्यावसायिक उद्योग समूह के. के. मोदी फॅमिली ट्रस्टमध्ये सुरू असलेल्या संपत्तीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ललिल मोदी यांनी मुलगा रुचिर मोदी याला तातडीने आपला उत्तराधिकारी घोषित केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर लंडनमधील रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या ललित मोदी यांनी सोशल मीडियावर रुचिर मोदी याला कौटुंबिक बाबींमधील आपला उत्तराधिकारी बनवण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय मुलगी आलिया हिच्याशी बोलल्यानंतर घेतला असल्याचे ललित मोदी यांनी सांगितले.
ललित मोदी यांनी सांगितले की, मी याबाबत माझ्या मुलीसोबत चर्चा केली आहे. तसेच एलकेएम कुटुंबातील कामकाजाचे नियंत्रण आणि ट्रस्टमधील आपल्या हितसंबंधांचं नेतृत्व माझा मुलगा रुचिर मोदीकडे सोपवलं पाहिजे, याबाबत आमचं एकमत झालं आहे. ललित मोदींचा त्यांची आई आणि बहिणीसोबत कौटुंबिक संपत्तीच्या मालकीवरून वाद सुरू आहे. ललित मोदींनी या वादाचा उल्लेख प्रलंबित आणि कठीण असा केला आहे. हा वाद मिटवण्यासाठी अनेक टप्प्यातील विचारविनिमय झाला आहे. मात्र हा वाद संपण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही आहेत.
आयपीएलचे माजी चेअरमन असलेल्या ललित मोदी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मेक्सिको सिटी येथून लंडन येथे आणण्यात आले आहे. त्यांना कृत्रिम ऑक्सिजन दिला जात आहे. रुचिर मोदी यांना कुटुंबाचा उत्तराधिकारी बनवल्यानंतर आता फॅमिली ट्रस्टच्या कुठल्याही संपत्ती किंवा उत्पन्नामध्ये कुठलीही रुची राहणार नाही. मात्र ते केकेएमएफटीचे विश्वस्त म्हणून कायम राहील, असेहील ललित मोदी यांनी स्पष्ट केले.