ललितगेट; कुणाचाही राजीनामा नाही
By admin | Published: July 1, 2015 01:24 AM2015-07-01T01:24:05+5:302015-07-01T01:24:05+5:30
ललितगेट आणि प्रामुख्याने राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे व त्यांचे पुत्र दुष्यंतसिंग यांच्या भूमिकेवरुन एकीकडे काँग्रेसने राजकीय हल्ला तीव्र केला असताना दुसरीकडे भाजपाने
नवी दिल्ली : ललितगेट आणि प्रामुख्याने राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे व त्यांचे पुत्र दुष्यंतसिंग यांच्या भूमिकेवरुन एकीकडे काँग्रेसने राजकीय हल्ला तीव्र केला असताना दुसरीकडे भाजपाने विरोधकांच्या आक्रमणाला फारसे महत्त्व न देण्याचे ठरविले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी कितीही गोंधळ घातला, दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प पाडले तरीही याप्रकरणी कुठलाही मंत्री अथवा मुख्यमंत्री राजीनामा देणार नाही, असे डावपेच भाजपाने आखले आहेत.
पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळातही संसद अधिवेशनाचे कामकाज ठप्प पडत होते. परंतु त्यांच्या कलंकित मंत्र्यांनी संबंधितप्रकरणी न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच राजीनामा दिले. एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल असे ललित मोदी प्रकरणात काहीही नाही, असा भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याचा दावा आहे. त्यातच वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याने राजस्थानातही आणखी एक येदियुरप्पा तयार होऊ शकतो. कर्नाटकात भाजपाचे तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांना पक्षश्रेष्ठींनी पदत्याग करण्याचे निर्देश दिल्यानंतर येदियुरप्पांनी बंडखोरी करून आपल्या समर्थकांसह नवा पक्ष स्थापन केला होता. याचे परिणाम भाजपाला अनेक निवडणुकांमध्ये भोगावे लागले. अखेर पक्षाला येदियुरप्पांची सन्मानाने घरवापसी करावी लागली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याप्रकरणी राजे यांनी राजीनामा दिल्यास विरोधक आणखी आक्रमक होऊ शकतात.
दरम्यान, ललित मोदींसोबतच्या संबंधांबाबत काँग्रेसकडून दररोज होणाऱ्या आरोपांवर विचारलेल्या कुठल्याही प्रश्नावर मौन पाळण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी वसुंधरा राजे यांना केली आहे. या संदर्भातील प्रश्नांना राजस्थान भाजपाचे अध्यक्ष आणि प्रवक्ता उत्तर देतील, असे सांगण्यात आले.