लालूप्रसाद यादव मीडियाचे डार्लिंग- नितीश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 06:39 PM2017-09-04T18:39:55+5:302017-09-04T20:38:17+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.
पटणा, दि. 4 - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना टीकात्मकरीत्या मीडियाचे डार्लिंग असं संबोधलं आहे. ते म्हणाले, मीडियात कायम चर्चेत राहण्यासाठी लालूप्रसाद यादव वेगवेगळ्या पद्धतीनं भाषणबाजी करतात. केंद्रीय मंत्रिमंडळात जनता दल युनायटेडला सहभागी होण्याची इच्छा आणि अपेक्षा नव्हती.
पटणामधील एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची कोणतीही इच्छा आणि आकांक्षा नव्हती. मात्र यावर काही लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा करत आहेत. मीडियामध्ये या सर्व विषयांची चर्चा झाली. त्यावेळी तुमच्यासाठी डार्लिंग असणा-या लोकांनासुद्धा बोलण्याची संधी मिळाली. मीडियाचे डार्लिंग असलेल्या लालूप्रसाद यादव यांची विधानं कोणीही गांभीर्यानं घेत नाही. लालूप्रसाद यादव यांना जे बरळायचं आहे ते त्यांनी बरळत राहावं. आम्ही बिहारची जनता, बिहारचे हित आणि विकासासाठी कटिबद्ध आहोत. केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूची कोणतीही उपेक्षा करण्यात आलेली नाही. मीडियानं यावर जास्त चर्वितचर्वण करू नये, असंही नितीश कुमार म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात गांधी मैदानावर आयोजित केलेल्या ‘बीजेपी भगाओ, देश बचाओ’ रॅलीला मोठी गर्दी उसळली होती. संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आदींनी या रॅलीला हजेरी लावली होती.
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, 2019च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाचा पराभव करू आणि त्यासाठी विरोधकांच्या एकीचे दर्शन या रॅलीतून दिसेल. जदयूचे बंडखोर नेते शरद यादव यांचे लालूप्रसाद यादव यांनी व्यासपीठावर गळाभेट घेऊन स्वागत केले. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करुन शरद यादव या रॅलीत सहभागी झाले आहेत. त्यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे. जदयूचे राज्यसभा सदस्य अली अनवर हेही या रॅलीला उपस्थित होते. जदयूचे नेते के. सी. त्यागी यांनी शरद यादव यांना पाठविलेल्या पत्रात रॅलीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, शरद यादव यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्यास असे समजण्यात येईल की, त्यांनी स्वत:च्या इच्छेनुसार पक्ष सोडला आहे.
आणखी वाचा
बिहारमध्ये याआधी आलेली पूरस्थिती मोदींना महत्त्वाची वाटली नाही- लालू प्रसाद यादव
तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे स्वागत राबडी देवी यांनी केले. व्यासपीठावर भाकपचे महासचिव एस. सुधाकर रेड्डी आणि सचिव डी. राजा यांची उपस्थिती होती. झामुमोचे प्रमुख आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, झाविमोचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी, राष्ट्रवादीचे नेते व संसद सदस्य तारिक अन्वर यांचीही उपस्थिती होती. या वेळी रघुवंश प्रसाद सिंह, अब्दुल बारी सिद्दीकी, शिवानंद तिवारी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी महाआघाडी तोडल्याबद्दल नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. तर तेजस्वी यादव हे बिहारचे भावी नेते आहेत, असे गौरवोद्गार काढले. अखिलेश यादव, हेमंत सोरेन, तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यांनी व्यासपीठावरुन हात उंचावून एकतेचा संदेश दिला.