लालूंना १४ वर्षे शिक्षा; चौथ्या चारा घोटाळ्याचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 05:42 AM2018-03-25T05:42:20+5:302018-03-25T05:42:20+5:30
चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शनिवारी दोषी ठरविले असून, त्यांना दोन वेगवेगळ्या कलमांखाली प्रत्येकी सात वर्षे याप्रमाणे एकूण १४ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
- एस. पी. सिन्हा
रांची/पाटणा : चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शनिवारी दोषी ठरविले असून, त्यांना दोन वेगवेगळ्या कलमांखाली प्रत्येकी सात वर्षे याप्रमाणे एकूण १४ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा त्यांना वेगवेगळ्या भोगाव्या लागणार आहेत. लालू यादव सध्या बिरसा मुंडा कारागृहात आधीच्या घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत आहेत.
या दोन्ही कलमान्वये लालू यादव यांना प्रत्येकी ३0 लाख याप्रमाणे ६0 लाख रुपये दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. दंड न भरल्यास त्यांना आणखी एक वर्ष शिक्षा भोगावी लागणार आहे. याखेरीज अन्य दोषींना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयाने हा निकाल सुनावला.
आतापर्यंतचे तीन व आज अशा चार प्रकरणांत मिळून लालू प्रसाद यादव यांना २0 वर्षे व ६ महिने शिक्षा झाली आहे. रांची न्यायालयाने या चौथ्या चारा घोटाळ्यात १२ जणांना दोषी ठरवले असून, १९ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी डिसेंबर १९९५ ते डिसेंबर १९९६ या काळात दुमका येथील कोषागारातून अवैधरीत्या ३ कोटी ७६ लाख रुपये काढल्याचा आरोप आहे. दुमका आता झारखंडमध्ये आहे. या प्रकरणाची सुनावणी ५ मार्च रोजी पूर्ण झाली होती. त्यांना १९ मार्च रोजी दोषी ठरवण्यात आले. मार्चला यावर निर्णय झाला व त्यांना दोषी ठरवले.
लालू यादव यांना चारा घोटाळ्याच्या पहिल्या प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दुसऱ्या प्रकरणामध्ये त्यांना डिसेंबर २0१७ मध्ये साडेतीन वर्षांची शिक्षा देण्यात आली. तिसºया प्रकरणातही ते दोषी आढळले आणि त्यांना जानेवारी २0१८ रोजी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली.
जामिनासाठी अर्ज
रांचीच्या सरकारी रुग्णालयात उपचार घेणाºया लालूंनी झारखंड हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याची सुनावणी ६ एप्रिल रोजी होईल.