इस्त्री करणाऱ्या महिलेला लालूंनी दिली उमेदवारी; राजदकडून तीन उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 08:18 AM2022-06-01T08:18:13+5:302022-06-01T08:18:30+5:30
सहयोगी पक्ष नाराज
-एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमध्ये कपडे धुणाऱ्या व इस्त्री करणाऱ्या मुन्नादेवीला विधान परिषदेत पाठविण्याचा निर्णय राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
लालूंनी विधान परिषदेसाठी युवा राजद प्रदेशाध्यक्ष मोहम्मद कारी सोहैब, महिला विभागाच्या प्रदेश सरचिटणीस मुन्नादेवी व रोहतासचे अशोक कुमार पांडेय यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ‘राजद’कडून उमेदवारी मिळाल्यानंतर मुन्नादेवींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी लालूंचे आभार मानले आहेत. तेजप्रताप यादव स्वत: वाहन चालवत मुन्नादेवींना त्यांच्या घरी सोडण्यासाठी गेले.
मुन्नादेवींनी सांगितले की, लालूप्रसाद यादव व तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी राबडीदेवी यांच्या निवासस्थानी गेले होते. तेथे मी त्यांना म्हणाले की, आम्ही लोकांचे कपडे धुऊन उदरनिर्वाह करताे. आपण उमेदवारी देऊन सन्मान केला आहे. लोक लालूंवर घराणेशाहीचा आरोप करतात; परंतु त्यांच्या कुटुंबाने दलित व गरिबांचा सन्मान केला आहे. बिहारची जनता आजही लालूंच्या बरोबर आहे, असे त्या म्हणाल्या. उमेदवारी जाहीर होताच मुन्नादेवींच्या घरी लोक भेटण्यासाठी गर्दी करीत आहेत.
एकतर्फी उमेदवारी जाहीर केल्याने सहयोगी भडकले
लालूंनी विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा करताच सहयोगी पक्ष काँग्रेस व भाकपा-माले भडकले आहेत. काँग्रेस व भाकपा-माले एकत्रित निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. राजदने भाकपा-मालेला एक जागा देण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेले आश्वासन पाळले नाही, असा आरोप करण्यात आला आहे, तर काँग्रेसने म्हटले आहे की, राजदने सहयोगी पक्षांशी चर्चा न करता उमेदवार घोषित केले आहेत.