चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणातही लालूप्रसाद दोषी, पाच वर्षांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 11:54 AM2018-01-24T11:54:24+5:302018-01-24T14:48:55+5:30
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याशी संबंधित अजून एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं असून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
रांची - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याशी संबंधित अजून एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं असून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने चाईबासा प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवत पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सोबतच पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रांवरही दोष सिद्ध झाले आहेत. चारा घोटाळ्यातील हे तिसरं प्रकरण आहे. न्यायालयाने याप्रकरणी 56 पैकी 50 आरोपींना दोषी ठरवलं होतं. जगन्नाश मिश्रा आणि लालू प्रसाद यादव यांच्यासह 50 आरोपींना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवल्यानंतर आरजेडीचे वरिष्ठ नेता रघुवंश प्रसाद सिंह यांनी चारा घोटाळ्यातील सर्व निर्णयांविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं होतं.
Third fodder scam case, the Chaibasa Treasury case: Former Bihar CM Jagannath Mishra also found guilty by Special CBI court in Ranchi
— ANI (@ANI) January 24, 2018
याआधी चारा घोटाळ्यात साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांची रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात रवानगी झाली आहे. आता लालूप्रसाद यादव यांना हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे. तुरुंगात एक कैदी म्हणून लालू यादव यांना माळीकाम देण्यात आले असून, त्यासाठी त्यांनी वेतनही मिळणार आहे. वृत्तांनुसार लालू यादव यांना माळीकामासाठी दररोज 93 रुपये एवढा मेहनताना मिळणार आहे. या खटल्यात लालूंसह १६ आरोपींना २३ डिसेंबर रोजी दोषी ठरविण्यात आले होते. न्या. शिवपाल सिंग यांनी शनिवारी दुपारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ माध्यमाने शिक्षा सुनावली. लालूंना भारतीय दंड विधान व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये सर्व मिळून साडेतीन वर्षांचा कारावास देण्यात आला.
चैबासा प्रकरणी 10 जानेवारीलाच युक्तिवाद पुर्ण झाला होता. न्यायालयाने 24 जानेवारीला निर्णय सुनावणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार न्यायालयाने आज निर्णय सुनावत लालूंना दोषी ठरवलं आहे.
People know how BJP,RSS and more importantly Nitish Kumar have conspired against Lalu ji. We will approach higher courts against all these verdicts: Tejashwi Yadav on Lalu Yadav convicted in third fodder scam case pic.twitter.com/z8vnudcSBe
— ANI (@ANI) January 24, 2018
काय आहे चारा घोटाळा
पूर्वी बिहारमध्ये व आता झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या संदर्भात हा खटला होता. प्रत्यक्षात चाºयाचा पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता.
या घोटाळ्याच्या एकूण ३३ खटल्यांपैकी सहा खटल्यांमध्ये लालू प्रसाद आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे. अन्य चार खटल्यांचे कामकाज याच न्यायालयात सुरू आहे. याआधी चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती.
सन २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला. पण शिक्षेला स्थगिती न दिली गेल्याने त्यांना ११ वर्षे कोणतीही निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. नव्या शिक्षेने त्यांच्या अपात्रतेचा कालावधी आणखी सहा वर्षांनी वाढेल.