ऐश्वर्या राजदच्या वाटेवर, बिहारमध्ये लागली होर्डिंग्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 10:59 AM2018-07-05T10:59:56+5:302018-07-05T11:05:43+5:30
ऐश्वर्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत
पाटणा : बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (राजद)च्या 22व्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. वर्धापन दिनानिमित्त पाटण्यात ठिकठिकाणी होर्डिंग्जही लावण्यात आली आहेत. मात्र या होर्डिंग्जमध्ये लालू प्रसाद यादव यांची सून आणि तेज प्रताप यादवची पत्नी ऐश्वर्या राय हिचा फोटो झळकला आहे. तिच्या फोटोमुळे ऐश्वर्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पाटण्यात जागोजागी हे होर्डिंग्ज लावल्यामुळे लालू यांची सून लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
ऐश्वर्या ही राजदचे आमदार आणि बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात आहे. दरोगा राय 16 फेब्रुवारी 1970 ते 12 डिसेंबर 1970 या कालावधीत बिहारचे नेतृत्व केले. लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ऐश्वर्या राय राजकारणात येणार का याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी तेज प्रताप यादव यांनी ऐश्वर्या राजकारणात येणार नसल्याचे म्हटले होते. मात्र आता होर्डिंग्ज मध्ये राबडी देवी आणि मीसा भारती यांच्यामध्ये ऐश्वर्याला जागा मिळाली असल्याने ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.