लालू प्रसाद यादव यांना पाच दिवसांचा पॅरोल मंजूर, मुलाच्या लग्नात होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 12:50 PM2018-05-09T12:50:36+5:302018-05-09T12:50:36+5:30
लालू प्रसाद यादव यांना आता मुलाच्या लग्नात सहभागी होता येणार आहे.
पाटणा- चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आता मुलाच्या लग्नात सहभागी होता येणार आहे. लालू प्रसाद यादव यांना पाच दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. 12 मे रोजी लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांचं लग्न आहे. पॅरोल मंजूर झाल्याने मुलाच्या लग्नात सहभागी होण्याचा लालूंचा मार्ग मोकळा झाला आहे.
लालू प्रसाद यादव यांना 9 मे ते 14 मेपर्यंत पॅरोलवर सोडण्यात यावं,अशी शिफारस जेल सुप्रिटेंडेंटने केली होती. तसंच त्यांच्या पॅरोलवर विचारविनिमय करण्यासाठी त्यांची फाइल महाधिवक्यांकडे पाठविली होती. त्यानंतर त्यांना पाच दिवसांचा पॅरोज मंजूर करण्यात आला आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवलं. डिसेंबर महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. लालू प्रसाद यादव यांना तीन ठिकाणच्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं होतं. दुमका, देवघर आणि चायबासा कोषागरांचा यामध्ये सहभाग होता. दोषी ठरविल्यानंतर लालूंची बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती.