"पुढच्या वेळी ते बिहारशी बालपणाचे नाते सांगतील"; मखाना खाण्यावरुन लालूंनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:56 IST2025-02-27T10:49:39+5:302025-02-27T10:56:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मखानावरील विधानावरुन लालू प्रसाद यादव यांनी टीका केली आहे.

"पुढच्या वेळी ते बिहारशी बालपणाचे नाते सांगतील"; मखाना खाण्यावरुन लालूंनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा
Lalu Prasad Yadav Jibe On PM Narendra Modi: बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीला सात महिन्यांचा अवधी असताना तिथल्या राजकारणात हालचाली सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या आमदारांना स्थान देण्यात आलं आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपण वर्षातील ३६५ दिवसांपैकी ते ३०० दिवस मखाना खात असल्याचे म्हटलं होतं. आता आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. पुढच्या वेळी पंतप्रधान मोदी ३५० दिवस बिहारी भुंजा खातील असं लालू प्रसाद यांनी म्हटलं.
बिहार दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी मखानाला सुपरफूड म्हटलं होतं. यावरुनच लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. यावेळी आमच्या प्रश्नांवर पंतप्रधानांनी वर्षात फक्त ३०० दिवस मखना खाण्याबाबत सांगितले. पुढच्या वेळी ते ३५० दिवस ‘बिहारी भुंजा’ खाण्यावर आणि १०० दिवस भागलपुरी सिल्क घालण्यावर बोलतील असं लालू प्रसाद यादव म्हणाले.
लालू प्रसाद यादव यांनी 'एक्स'वर पोस्ट करत पंतप्रधान मोदीना टोला लगावला. "यावेळी आमच्या प्रश्नांवर पंतप्रधानांनी वर्षात फक्त ३०० दिवस मखना खाण्याबाबत सांगितले. पुढच्या वेळी ३५० दिवस “बिहारी भुंजा” खाण्यावर बोलतील. १०० दिवस भागलपुरी सिल्क घालतील. छठमैयाचा उपवास करतील. गंगेत स्नान करतील. जानकी मैय्याच्या मंदिरात जातील. बिहारशी बालपणाचे नाते जोडतील. मधुबनी चित्र काढलेले उपरणे किंवा कुर्ता घालतील. भोजपुरी, मगही, अंगिका, बज्जिका, सुरजापुरी आणि मैथिली भाषांमधून २-४ उधार घेतलेल्या ओळींनी भाषण सुरु करतील. जननायक कर्पूरी ठाकूर जी, लोकनायक जयप्रकाश जी आणि इतर महापुरुषांशी असलेल्या संबंधांबद्दल सांगतील," असा टोला लालू प्रसाद यादव यांनी लगावला.
दरम्यान, बिहार दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भागलपूर जिल्ह्यातून देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा १९ वा हप्ता जारी केला होता. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात,"आज तुमचा मखाना देशातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मी देखील ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस मखाना नक्कीच खातो. सरकारच्या प्रयत्नांमुळे भारताच्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. आता बिहारच्या मखानाची वेळ आली आहे," असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.