Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली; अवयवांची हालचाल थांबली, AIIMS मध्ये उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 16:18 IST2022-07-07T16:17:16+5:302022-07-07T16:18:05+5:30
Lalu Prasad Yadav: काही दिवसांपूर्वीच लालू प्रसाद यादव पायऱ्यांवरुन घसरुन पडले होते, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली; अवयवांची हालचाल थांबली, AIIMS मध्ये उपचार सुरू
पाटणा: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती खालावली आहे. रात्री उशिरा त्यांना पाटणा येथून दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. लालूंचा मुलगा तेजस्वी यादव यांनी सांगितल्यानुसार, 'लालूंच्या शरीराची हालचाल बंद झाली आहे. येणारा काळ त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. सध्या एम्समधील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.'
मंदिर-मशिदीत समर्थकांच्या प्रार्थना
3 जुलै रोजी लालू प्रसाद यादव पायऱ्यावरुन उतरताना पडले होते. यात त्यांच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. तेजस्वी यांनी सांगितल्यानुसार, फ्रॅक्चर झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. सध्या लालूंसाठी त्यांचे समर्थक प्रार्थना करत आहेत. पाटण्यातील मंदिरे आणि मशिदींमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे.
दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू
लालू यादव दिल्लीतील एम्समध्ये दाखल आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या शरीरातील टॉक्सीनचे प्रमाण वाढत आहे. क्रिएटिन लेव्हल 4 ते 7 पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे डायलिसिसची गरज भासू लागली आहे. किडनी नीट काम करत नसल्याने युरियाचे प्रमाणही वाढत आहे.
लालूंना अनेक गंभीर आजार
एका अहवालानुसार, लालू यादव यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे आजार, किडनी स्टोन, तणाव, थॅलेसेमिया, प्रोस्टेट वाढणे, युरिक ऍसिड वाढणे, मेंदूशी संबंधित आजार, कमकुवत प्रतिकारशक्ती, उजव्या खांद्याच्या हाडात समस्या आहे, पायाच्या हाडांची समस्या, डोळ्यांची समस्या, POST AVR 2014 (हृदयाशी संबंधित) यासारख्या समस्या आहेत. या सर्व आजारांपैकी लालूंना किडनीच्या आजाराने सर्वाधिक त्रास झाल्याचे सांगितले जात आहे.