लालू-नितीश कुमारांचे गुरू, साधेपणासाठी होते प्रसिद्ध, कोण होते कर्पुरी ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 10:57 PM2024-01-23T22:57:44+5:302024-01-23T22:58:28+5:30

Karpuri Thakur: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बिहार महत्त्वाचं ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकारणात आदराचं स्थान असलेल्या कर्पुरी ठाकूर यांना केंद्र सरकारकडून भारतरत्न सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

Lalu Prasad Yadav-Nitish Kumar's mentor, famous for his simplicity, was Karpuri Thakur | लालू-नितीश कुमारांचे गुरू, साधेपणासाठी होते प्रसिद्ध, कोण होते कर्पुरी ठाकूर

लालू-नितीश कुमारांचे गुरू, साधेपणासाठी होते प्रसिद्ध, कोण होते कर्पुरी ठाकूर

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बिहार महत्त्वाचं ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकारणात आदराचं स्थान असलेल्या कर्पुरी ठाकूर यांना केंद्र सरकारकडून भारतरत्न सन्मान जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने केलेली ही घोषणा बिहारच्या राजकारणात मारलेला मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. तसेच आता कर्पुरी ठाकूर यांची आठवण राजकारणात पुन्हा एकदा ताजी झाली आहे.

कर्पुरी ठाकूर यांना बिहारचे जननायक असे म्हणतात. त्यांनी बिहारचं दोन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. २४ जानेवारी १९२४ रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील पितौरिया गावात कर्पुरी ठाकूर यांचा जन्म झाला होता.  आता या गावाला कर्पुरीग्राम म्हणून ओळखलं जातं. कर्पुरी ठाकूर यांच्या साधेपणाची उदाहरणं आजही दिली जातात.

कर्पुरी ठाकूर यांनी २२ डिसेंबर १९७० ते २ जून १९७१ आणि २४ जून १९७७ ते २१ एप्रिल १९७९ यांनी बिहारचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होतं. ते नेहमी गरीबांच्या अधिकारांबाबत बोलत असत. मुख्यमंत्री असताना त्यांनी वंचित आणि मागासांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मुंगेरीलाल आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाच्या अहवालावरून त्यांनी १९७८ मध्ये मागासांना १२ टक्के आरक्षणाची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयाचा लाभ ७९ जातींना मिळाला या निर्णयांतर्गत अतिमागास वर्गाला ८ टक्के आणि मागास वर्गीयांसाठी ४ टक्के आरक्षण देण्यात आलं.

कर्पुरी ठाकूर यांचे राजकीय गुरू डॉ. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण हे होते. मधु लिमये आणि रामसेवक यादव त्यांचे सहकारी होते. बिहारमध्ये कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी तो त्याला कर्पुरी ठाकूर यांना आपला आदर्श मानतो. नितीश कुमार, रामविलास पासवान, लालूप्रसाद यादव, आणि सुशीलकुमार मोदी यांचे कर्पुरी ठाकूर हे राजकीय गुरू होते.

कर्पुरी ठाकूर यांनी दोन वेळा बिहारचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. तर एकदा उपमुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मात्र असं असलं तरी ते कुठल्याही वैयक्तिक प्रवासासाठी रिक्षाचा वापर करत. स्वत:ची कार खरेदी करावी एवढं मुख्यमंत्रि म्हणून त्यांना मानधन मिळत नसे. वयाच्या केवळ ६४ व्या वर्षी १७ फेब्रुवारी १९८८ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्युनंतर समाजवादी नेते हेमवतीनंदन बहुगुणा त्यांच्या गावात गेले. तेव्हा कर्पुरी ठाकूर यांचं निवासस्थान असलेलं झोपडीवजा घर पाहून त्यांचे डोळे पाणावले. त्या झोपडीशिवाय त्यांची काहीच संपत्ती नव्हती.  

Web Title: Lalu Prasad Yadav-Nitish Kumar's mentor, famous for his simplicity, was Karpuri Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.