लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा; ६० लाख रुपयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 08:43 AM2022-02-22T08:43:19+5:302022-02-22T08:43:46+5:30
देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्यातील पाचव्या प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्यातील पाचव्या प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. दोरांदा येथील कोषागारातून बेकायदेशीररीत्या पैसे काढल्याबद्दल यादव यांना न्यायालयाने ६० लाख रुपयांची दंडही ठोठावला.
विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. साही यांनी चारा घोटाळ्याबाबतच्या पाचव्या गुन्ह्यात लालूप्रसाद यादव व अन्य ७४ जणांना १५ फेब्रुवारी रोजी दोषी ठरविले. तसेच २४ जणांची निर्दोष मुक्तता केली. १९९४-९५ साली रांची येथील दोरांदा कोषागारातून बेकायदेशीररीत्या १३९.३५ कोटी रुपये काढण्यात आल्याचा या सर्वांवर आरोप होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे लालूप्रसाद यादव (वय वर्षे ७४) रांची येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत.
चारा घोटाळ्याच्या पाचव्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने याआधी ३४ जणांना प्रत्येकी तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली तसेच २० हजार ते २ लाख रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावला.