"लालूंनी गळ्यात नितीश कुमारांच्या फोटोचं लॉकेट घातलं पाहिजे..."; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 06:24 PM2024-07-07T18:24:42+5:302024-07-07T18:25:48+5:30
Lalu Prasad Yadav Nitish Kumar: केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा लालू प्रसाद यादवांना अजब सल्ला, कारण काय?
Lalu Prasad Yadav Nitish Kumar: लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्रीनितीश कुमार यांच्या नावाची सातत्याने चर्चा होत होती. त्यांनी अपेक्षेप्रमाणे नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आणि NDA मध्येच राहण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्याचे कारण काहीसे वेगळे आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केलेल्या विधानामुळे नितीश कुमार आणि लालू प्रसाद या दोन नावांची चर्चा सुरु आहे.
राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव हे काळाच्या ओघात राजकीयदृष्ट्या कमकुवत झाले आहेत. लालू आणि त्यांचा पक्ष आरजेडी यांच्या 'राजकीय पुनरुज्जीवना'साठी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आभार मानले पाहिजेत आणि नितीश कुमारांचा फोटो असलेले लॉकेट गळ्यात घातले पाहिजे, असा अजब सल्ला गिरीराज सिंह यांनी दिला.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, "नितीश कुमार यांनी २०१५ पासून पुढे आरजेडीला नवे जीवन दिले. अन्यथा लालूंचा पक्ष संपण्याच्या मार्गावर होता. नितीश कुमारांनी लालूंच्या पक्षाला त्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आणले. लालू प्रसाद यादव हे त्यांच्या कुटुंबातील सर्वात कमकुवत व्यक्ती आहेत. त्यांनी नितीश कुमार यांच्यासमोर नतमस्तक व्हायला हवे आणि त्यांच्या फोटोचे लॉकेट गळ्यात घालायला हवे. कारण नितीश यांच्यामुळेच राजदला राजकीय पुनरुज्जीवन मिळाले."
शुक्रवारी, राजदच्या २८व्या वर्धापनदिनी, गिरीराज सिंह यांनी लालू प्रसाद यादव यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कमकुवत असून ऑगस्टपर्यंत ते पडू शकते, असे म्हटले होते. या विधानाला प्रत्युत्तर देताना गिरीराज सिंह यांनी लालूंवर हल्लाबोल केला.