सीबीआय कोर्टासमोर लालू प्रसाद यादव यांचं आत्मसमर्पण; तुरुंगात होणार रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 12:30 PM2018-08-30T12:30:12+5:302018-08-30T12:32:34+5:30
कोर्टानं लालू प्रसाद यांना शरण येण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती
रांची: चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज रांचीतील सीबीआय न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. यानंतर न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना बिरसा मुंडा तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. तुरुंगात कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर लालू प्रसाद यादव यांना रांचीतील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.
लालू प्रसाद यादव यांनी याआधी झारखंड उच्च न्यायालयाकडे जामिनाचा कालावधी वाढवण्यासाठी याचिका केली होती. मात्र त्यांची ही याचिका न्यायालयानं फेटाळली. यानंतर त्यांना 30 ऑगस्टपर्यंत न्यायालयापर्यंत आत्मसमर्पण करण्याची सूचना करण्यात आली होती. यानंतर लालू प्रसाद यादव आज न्यायालयाला शरण आले. त्याआधी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिथीगृहात झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांची भेट घेतली. यावेळी अनेक राजकीय नेते उपस्थित होते. ही भेट बराच वेळ सुरू होती. मरांडी यांची भेट घेतल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी सीबीआयच्या न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. 'माझी कोणतीही इच्छा नाही. सरकारनं मला योग्य वाटेल, त्याठिकाणी ठेवावं. माझ्या आरोग्याची जबाबदारी पूर्णपणे सरकारची आहे,' असं लालू प्रसाद म्हणाले.