लालूप्रसाद यादव यांना रात्री २ वाजता भूतं नेत होती स्मशानात, असे वाचले प्राण, नेमका काय प्रकार?   

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 02:30 PM2024-02-07T14:30:37+5:302024-02-07T14:31:12+5:30

Lalu Prasad Yadav: लालूप्रसाद यादव यांच्या बालपणातील एका घटनेची सध्या चर्चा होत आहे. या घटनेचा उल्लेख लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या ‘गोपालगंज से रायसीना: मेरी राजनीतिक यात्रा’ या आत्मचरित्रामध्ये केला आहे. 

Lalu Prasad Yadav was being taken to the crematorium by a ghost at 2 in the night. | लालूप्रसाद यादव यांना रात्री २ वाजता भूतं नेत होती स्मशानात, असे वाचले प्राण, नेमका काय प्रकार?   

लालूप्रसाद यादव यांना रात्री २ वाजता भूतं नेत होती स्मशानात, असे वाचले प्राण, नेमका काय प्रकार?   

बिहारमधील राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर गेल्या आठवड्यात लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची पुन्हा एकदा विरोधी पक्षात रवानगी झाली. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू झालेल्या चौकशांमुळे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्या बालपणातील एका घटनेची सध्या चर्चा होत आहे. या घटनेचा उल्लेख लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या ‘गोपालगंज से रायसीना: मेरी राजनीतिक यात्रा’ या आत्मचरित्रामध्ये केला आहे. 

या आत्मचरित्रातील उल्लेखानुसार लालूप्रसाद यादव यांनी बालपणी भुतांचा सामना केला होता. एका काळोख्या रात्री लालू प्रसाद यादव यांना दोन भुतं स्मशानाच्या दिशेने नेत होती. तेवढ्यात गावातील बरम बाबांनी त्यांचे प्राण वाचवले होते. लालू प्रसाद यादव सांगतात की, एकदा माझी गाठ भुतांशी पडली होती. माझ्या घराच्या मागे पिंपळाच्या झाडाखाली बरम बाबांचं ठिकाण होतं. एकदा पौर्णिमेच्या रात्री तिथे भोजन आणि गायनाचा कार्यक्रम झाला.  तिथे बसल्या जागीच मला झोपा आली. बाकीचे लोक कार्यक्रम संपल्यानंतर घरी गेले.  माझे डोळे उघडले. तेव्हा तिथे दोन मुलगे उभे होते. त्यांनी मला सोबत येण्यास सांगितलं. झोपेत असल्याने मीही त्यांच्या मागे चालू लागलो. त्यांनी मला स्माशानाच्या दिशेने नेले. 

लालू यांनी पुढे लिहिले की, तेवढ्यात मी लघुशंकेसाठी थांबलो असताना तिथून गावातील तपेसर बाबा जाताना दिसले. त्यांनी विचारलं कोण आहे? मी उत्तर देत म्हणालो की, ललुआ. त्यानंतर त्यांनी मला कुठे जात आहे, असं विचारलं तसेच घरी जाण्यास सांगितलं. तेवढ्यात तिथे असलेले ते दोन मुलगे पळून गेले. दुसऱ्या दिवशी मी त्या दोन्ही मुलांकडे गेलो तेव्हा त्यांनी काल रात्री आपण तिथे गेलो नसल्याचे सांगितले. तर तपेसर बाबांनीही आपण रात्री त्या वाटेने गेलो नव्हतो, असं सांगितलं. 

लालू प्रसाद यादव पुढे लिहितात की, जेव्हा मी या घटनेबाबत आईला विचारलं तेव्हा ती म्हणाली की, तुझ्या मित्रांचं सोंग घेऊन जे दोन जण आले होते. ती भुतं होती. तसेच बरम बाब यांनी तुला तपेसर बाबाचं रूप घेऊन वाचवलं. नाहीतर त्यांनी तुला स्मशानात नेऊन मारलं असतं. आईने मला बरम बाबांची प्रार्थना करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून मी जेव्हा गावात जातो तेव्हा बरम बाबांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही, असेही लालू प्रसाद यादव यांनी सांगितले.  लालू प्रसाद यादव यांच्या त्यांच्या ‘गोपालगंज से रायसीना: मेरी राजनीतिक यात्रा’ या आत्मचरित्राचं लेखन हे नलिन वर्मा यांनी केलं आहे.  

Web Title: Lalu Prasad Yadav was being taken to the crematorium by a ghost at 2 in the night.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.