लालू प्रसाद यादव यांच्या मिसा भारतीवर आरोपपत्र दाखल, मनी लाँड्रिंगचे प्रकरण भोवणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:01 AM2017-12-24T01:01:13+5:302017-12-24T01:01:39+5:30
लालू प्रसाद यादव यांची कन्या व राज्यसभा सदस्य मिसा भारती यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी आरोपपत्र दाखल केले असून, मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवला आहे.
नवी दिल्ली : लालू प्रसाद यादव यांची कन्या व राज्यसभा सदस्य मिसा भारती यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी आरोपपत्र दाखल केले असून, मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवला आहे. त्यांचे पती शैलेंद्र यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. लालू प्रसाद यादव यांनाही आजच तुरुंगात जावे लागले.
ईडीचे वकील नितेश राणा यांनी विशेष न्या. एन. के. मल्होत्रा यांच्या न्यायालयात हे आरोप दाखल केले. याआधी तपास करीत असताना मिसा भारती यांच्या दिल्लीमधील फार्महाउसवर ईडीने टाच आणली होती. या फार्महाउसची किंमत सुमारे ३0 ते ४0 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. फार्महाउस खरेदी करताना त्यांनी काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे. ते विकत घेण्यासाठी मिसा भारती व त्यांचे पती शैलेश कुमार यांनी सुरेंद्र जैन आणि विरेंद्र जैन यांच्या कंपनीचा वापर केल्याचाही आरोप आहे.
करोडो रुपयांच्या बेनामी संपत्तीमुळे मिसा भारती व शैलेश कुमार ब-याच काळापासून ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने ८ जुलै रोजी मिसा व शैलेश कुमार यांच्या दिल्लीमधील तीन ठिकाणी छापे घातले होते.
जैन बंधूंना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली अटक झाली आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी मिसा भारती यांचे सीए राजेश अग्रवाल
यांनाही ईडीने अटक केली आहे. त्यांचे राजकीय पक्षांबरोबर संबंध असल्याचे समोर आले होते.
२२ कंपन्यांवर धाडी
प्राप्तिकर विभागाने दिल्ली व गुरुग्राम येथील लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपन्यांसह २२ ठिकाणी धाडी घातल्या होत्या. यादव कुटुंबीयांनी काही हजार कोटींचे घोटाळे केल्याचे सांगण्यात येते.