लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, डॉक्टरांनी तब्येतीबाबत दिली महत्त्वाची माहिती
By बाळकृष्ण परब | Published: January 21, 2021 10:10 PM2021-01-21T22:10:20+5:302021-01-21T22:11:17+5:30
Lalu Yadav Health Update : चारा घोटाळ्याप्रकरणी सध्या कारावासाची शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीमधील रिम्स रुग्णालयातील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत
रांची - राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली असून, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या छातीत संसर्ग आणि निमोनिया झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चारा घोटाळ्याप्रकरणी सध्या कारावासाची शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीमधील रिम्स रुग्णालयातील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. तिथेच आज संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली.
दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लालूप्रसाद यादव यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांना देण्यात आली आहे. लालूंची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच झारखंडचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता, रिम्सचे अधीक्षक डॉ. विवेक कश्यप आमि लालूप्रसाद यादव यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर उमेश प्रसाद त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पेईंग वॉर्डमध्ये पोहोचले.
लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीचा माहिती घेतल्यानंतर बन्ना गुप्ता माघारी परतले. तर डॉक्टर लालू यादव यांच्यावर उपचार करत आहेत. लालूंमध्ये निमोनियाची लक्षणे दिसत आहेत. कोरोनाची तपासणी करण्यासाठी त्यांचे नमुने घेण्यात आले असून, लालूंची रॅपिड अँटिजन टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. तर एक्स-रे रिपोर्टमध्ये त्यांच्या छातीत किंचीत संसर्ग दिसत आहेत.