"भाजप-आरएसएसचे कान धरून जातीनिहाय जनगणना करायला लावू", लालू प्रसाद यादवांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 01:55 PM2024-09-03T13:55:45+5:302024-09-03T14:00:02+5:30
lalu prasad Yadav On caste census : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातीनिहाय जनगणनेसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
Lalu prasad Yadav On BJP-RSS : जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, ही मागणी पुन्हा जोर धरताना दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातीनिहाय जनगणनेला पाठिंबा दिल्यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी जातीनिहाय जनगणनेवर भाष्य करताना एनडीए सरकारला इशारा दिला आहे.
लालू प्रसाद यादव जातीनिहाय जनगणनेबद्दल काय काय बोलले?
"आरएसएस आणि भाजपचे कान धरू,त्यांना जोर बैठका काढायला लावून त्यांच्या जातीनिहाय जनगणना करून घेऊ. जातीनिहाय जनगणना न करण्याची यांच्यात हिंमत नाही", असे लालू प्रसाद यादव म्हणाले.
याच मुद्द्यावर बोलताना लालू प्रसाद यादव म्हणाले, "यांना (एनडीए सरकारला) इतके मजबूर करू की जातीनिहाय जनगणना करावीच लागेल. दलित, मागास, आदिवासी आणि गरिबांनी एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे."
तेजस्वी यादवांची भूमिका काय?
"जातीनिहाय जनगणना करण्यास कोण नकार देऊ शकतो? जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी या (भाजप) लोकांची इच्छा नाही. कारण भाजपने सतत लोकांना न्यायालयात उभे केले नसते. आम्ही अनेकदा संसदेत प्रश्न विचारले. त्यांच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे की, त्यांना जातीनिहाय जनगणना करायची नाही", असे तेजस्वी यादव म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जातीनिहाय जनगणनेबद्दल भूमिका?
"पंच परिवर्तनाच्या अनुषंगाने या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. समरसतेला प्रोत्साहन देण्यासाठी कृती कार्यक्रम केला जाईल. जातीनिहाय जनगणनेचा वापर राजकारण आणि निवडणुकीच्या उद्दिष्टांसाठी व्हायला नको", अशी भूमिका संघाकडून मांडण्यात आली आहे.