मांझीच्या इफ्तार पार्टीला लालूप्रसादांची हजेरी

By admin | Published: June 29, 2016 06:02 AM2016-06-29T06:02:03+5:302016-06-29T06:02:03+5:30

मांझी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला लालुप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तसेच उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी हजेरी लावल्यामुळे सत्ताधारी आघाडीतील जनता दल (यू) मध्ये अस्वस्थता

Lalu Prasad's attendance to Manjhi's Iftar party | मांझीच्या इफ्तार पार्टीला लालूप्रसादांची हजेरी

मांझीच्या इफ्तार पार्टीला लालूप्रसादांची हजेरी

Next

एस. पी. सिन्हा,

पाटणा- बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला लालुप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तसेच उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी हजेरी लावल्यामुळे सत्ताधारी आघाडीतील जनता दल (यू) मध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, तर मांझी काही वेगळे राजकारण करु पाहत आहे की काय, या शंकेमुळे केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपा व एनडीएमध्येही खळबळ माजली आहे.
सध्या बिहारमध्ये विविध राजकीय नेत्यांतर्फे सतत इफ्तारच्या पार्ट्या सुरू आहेत. जीतनराम मांझी यांनी सोमवारी इफ्तारच्या खान्याचे आयोजन केले होते. त्याचे निमंत्रण मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव व लालुप्रसाद यादव यांच्यासह अनेकांना देण्यात आले होते. शिवाय मांझी यांनी लालुप्रसाद यांना फोन करूनही येण्याचा आग्रह केला होता. मुख्यमंत्री काही इफ्तार पार्टीला गेले नाहीत, पण लालुप्रसाद व तेजस्वी हे मात्र गेले.
मुळात यादव पिता-पुत्रांनी तिथे जाण्यामुळे जदयूमध्ये बरीच अस्वस्थता दिसू लागली आहे. सध्या लालुप्रसाद हे नितीश कुमार यांच्यावर नाराज असून, ती नाराजी दाखवण्यासाठीच ते तिथे गेले, असे काहींचे म्हणणे आहे. सत्ताधारी आघाडीत लालुप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल असला तरी नितीश कुमार या पक्षाला आणि त्यांच्या मंत्र्यांना फारसे विचारत नाहीत, अशी एक तक्रार आहे. शिवाय दारूबंदीच्या मुद्द्यावर आधी विचारविनिमय न केल्यामुळे राजदचे नेते संतप्त असल्याची चर्चा आहे.
एनडीएचा भाग असलेले जीतनराम मांझी यांचे बिहारमध्ये वेगळे राजकारण सुरू झाले आहे की काय, अशी चर्चा भाजपामध्ये चालली आहे. ते लालुप्रसाद यांच्याजवळ चालल्याने भाजपा नेते अस्वस्थ आहेत.
जीतनराम मांझी यांना वा त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपाशी जवळीक केल्याचा कोणताच फायदा मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यासाठीच त्यांनी लालुप्रसाद व तेजस्वी यादव यांना इफ्तारला बोलावले असावे, असे सांगण्यात येत आहे.
>आघाडीत आलबेल नाही?
आपणास मांझी यांनी फोन केला होता. पण तो आला नसता, तरी मी इथे येणार होतो, असे वक्तव्य लालूप्रसाद यांनी तिथे काढले. त्यांच्या या वक्तव्यामुळे बिहारच्या सत्ताधारी आघाडीत सारेकाही आलबेल नाही, असा अर्थ लावण्यात येत आहेत.
जीतनराम मांझी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये तेजस्वी यादव आणि लालू यादव.

Web Title: Lalu Prasad's attendance to Manjhi's Iftar party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.