यादव कुटुंबावर कोसळले आभाळ, लालूंना शिक्षा झाल्याच्या धक्क्याने बहिणीचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 06:02 PM2018-01-07T18:02:20+5:302018-01-07T18:41:59+5:30
या घटनेमुळे यादव कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. शनिवारी लालू यांना शिक्षा सुनावली जाणार होती. यामुळे गंगोत्री दिवसभर लालू यांच्यासाठी प्रार्थना करत होत्या.
पाटणा - लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याचे ऐकून त्यांची बहीण गंगोत्री देवी यांना जबर धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्या 75 वर्षाच्या होत्या. या घटनेमुळे यादव कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. शनिवारी लालू यांना शिक्षा सुनावली जाणार होती. यामुळे गंगोत्री दिवसभर लालू यांच्यासाठी प्रार्थना करत होत्या. पण लालू यांना साडेतीन वर्षांची शिक्षा झाल्याचे कळताच त्यांना धक्का बसला. अखेरीस रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गंगोत्री यांचे निधन झाल्याचे कळताच लालू यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या घरी धाव घेतली. ही आमच्या कुटुंबासाठी दुखद घटना आहे. असे लालू यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी सांगितले.
(आणखी वाचा - लालू म्हणतात जेलमध्ये किन्नर विचारतो, माझ्याशी लग्न करणार का ?, न्यायालयात हास्यकल्लोळ )
दरम्यान, लालू यांना बहिणीच्या अंत्यसंस्कारात सामील होता यावे यासाठी त्यांचे वकिल पॅरोलसाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. पण रविवार असल्याने अडचण असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. लालू यांना सहा भाऊ असून गंगोत्री देवी त्यांची एकुलती एक बहीण होती. चारा घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालू यांना दोषी ठरवल्यापासून गंगोत्री बैचेन होत्या.
(आणखी वाचा - लालूंच्या तुरुंगवासानंतर आता कुटुंबीयांवर निनावी मालमत्तेप्रकरणी कारवाईची टांगती तलवार )
गंगोत्री यांच्या तीन मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे बिहार पोलीस व रेल्वेत नोकरीस आहेत. पाटण्यातील प्राण्यांच्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरमध्ये त्या राहत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. सतत लालू यांना पैसेवाल्यांनी फसवलं असं बरळत होत्या.
लालूप्रसाद यादव तुरुंगात करणार माळीकाम -
साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांची रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात रवानगी झाली आहे. आता लालूप्रसाद यादव यांना हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे. तुरुंगात एक कैदी म्हणून लालू यादव यांना माळीकाम देण्यात आले असून, त्यासाठी त्यांनी वेतनही मिळणार आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार लालू यादव यांना माळीकामासाठी दररोज 93 रुपये एवढा मेहनताना मिळणार आहे.
काय आहे चारा घोटाळा
पूर्वी बिहारमध्ये व आता झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या संदर्भात हा खटला होता. प्रत्यक्षात चाºयाचा पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता. या घोटाळ्याच्या एकूण ३३ खटल्यांपैकी सहा खटल्यांमध्ये लालू प्रसाद आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे. अन्य चार खटल्यांचे कामकाज याच न्यायालयात सुरू आहे. याआधी चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती.
सन २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला. पण शिक्षेला स्थगिती न दिली गेल्याने त्यांना ११ वर्षे कोणतीही निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. नव्या शिक्षेने त्यांच्या अपात्रतेचा कालावधी आणखी सहा वर्षांनी वाढेल. गेले दोन आठवडे लालू बिरसा मुंडा कारागृहात आहेत.