लालू यादव पुन्हा गोत्यात!

By admin | Published: July 8, 2017 04:47 AM2017-07-08T04:47:01+5:302017-07-08T04:47:01+5:30

चारा घोटाळा प्रकरणात अडकलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव पुन्हा गोत्यात आले आहेत. रेल्वेमंत्री असताना केलेल्या कथित

Lalu Yadav again in the slot! | लालू यादव पुन्हा गोत्यात!

लालू यादव पुन्हा गोत्यात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : चारा घोटाळा प्रकरणात अडकलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव पुन्हा गोत्यात आले आहेत. रेल्वेमंत्री असताना केलेल्या कथित घोटाळ्यांप्रकरणी त्यांच्यासह यादव कुटुंबीय आणि हॉटेलच्या संचालकांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला. शिवाय लालू यादव यांच्याशी संबंधित १२ ठिकाणांवर छापेही टाकण्यात आले.
सीबीआयचे अतिरिक्त संचालक राकेश अस्थाना यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून पाटणा, रांची, भुवनेश्वर आणि गुरुगावमध्ये १२ ठिकाणी ही छापे टाकण्यात आले. हे कारस्थान २००४ ते २०१४ या काळातील आहे. भारतीय रेल्वेची दोन हॉटेल्स आयआरसीटीसीकडे चालविण्यासाठी दिली होती. त्यानंतर, त्यांचे संचालन आणि देखभालीचे काम पाटणास्थित सुजाता हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले होते. सुजाता हॉटेलला लाभ मिळवून देण्यासाठी निविदेतील अटी शिथिल करण्यात आल्या. त्या बदल्यात पाटण्यातील तीन एकर जमीन अतिशय कमी दरात ‘डिलाइट मार्केटिंग’ यांना देण्यात आली. ही कंपनी लालूप्रसाद यादव कुटुंबीयांच्या माहितीतील व्यक्तीची आहे. त्यानंतर ती ‘लारा (लालू-राबडी?) प्रोजेक्ट’ला देण्यात आली. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्य ‘लारा प्रोजेक्ट’चे मालक आहेत. जमिनीचे हे हस्तांतरण अतिशय कमी दरात झाल्याचे अस्थाना यांनी सांगितले. या जमिनीची किंमत ३२ कोटी रुपये आहे. लारा प्रोजेक्टला ही जमीन ६५ लाख रुपयांत देण्यात आली. म्हणजेच लालू यांनी दोन हॉटेल्सच्या देखभालीचे काम देण्याच्या बदल्यात त्या कंपनीकडून पाटण्यातील जमिनीच्या स्वरूपात लाच घेतली. या प्रकरणात प्राथमिक चौकशीनंतर ५ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मंत्रिमंडळातून बरखास्त करा
लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. या प्रकरणात नितीशकुमार कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी सांगितले.

कुणाविरुद्ध  गुन्हा?
तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव (६९) त्यांच्या पत्नी राबडी देवी, त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव आणि माजी केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ता यांच्या पत्नी सरला गुप्ता.
सुजाता हॉटेलचे दोन्ही संचालक विजय आणि विनय कोचर, चाणक्य हॉटेल, डिलाइट मार्केटिंग कंपनी (ही कंपनी आता लारा प्रोजेक्ट म्हणून ओळखली जाते.) यांच्या मालकांवर, तत्कालीन आयआरसीटीसीचे मुख्य संचालक पी.के. गोयल.
फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट करणे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकार, भाजपाचा संबंध नाही
या कारवाईशी सरकार वा भाजपाचा काहीही संबंध नाही. सीबीआय आपले काम करीत आहे. यात राजकीय सुडाची भावना कोठे दिसते? यात भाजपा कोठे दिसतो? जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध आरोप असतील, तर त्याची चौकशी केली जाऊ नये, असे वाटते की काय? पूर्वी नव्हते, इतके स्वातंत्र्य आता सीबीआयला आहे. यात हस्तक्षेप नाही. या कारवाईचा बिहारमधील राजद-जदयू आघाडीवर परिणाम होईल का, हे मला माहीत नाही. नितीशकुमार एक बुद्धिवान आणि परिपक्व व्यक्ती आहेत. काय करायचे, हे त्यांना चांगले माहीत आहे. - व्यंकय्या नायडू, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री

ही भाजपाविरुद्ध बोलण्याची शिक्षा
भाजपा आणि आरएसएसविरुद्ध बोलण्याची ही मला दिलेली शिक्षा आहे. मी कुणाला घाबरत नाही आणि भाजपाविरुद्ध विरोधकांना एकजूट करण्यासाठी काम करीतच राहीन. २७ आॅगस्टची पाटण्यातील रॅली आणखी जोमाने काढणार आहोत. आपल्याविरुद्धची कारवाई राजकीय द्वेषातून केली जात आहे, पण मी मागे हटणार नाही. भाजपा आणि मोदी सरकारला संपवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
- लालूप्रसाद यादव

हे सरकारच्या हातचे बाहुले
सीबीआय, ईडीसारख्या संस्था सरकारच्या हातातील बाहुले झाल्या आहेत. राजकीय विरोधकांविरुद्ध असे कट केले जात आहेत. लोकशाहीत असे प्रकार योग्य नाहीत. हे प्रकरण २००४ मधील आहे, तर गुन्हा २०१७ मध्ये का दाखल केला? भाजपा तीन वर्षे गप्प का होते?
- रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे प्रवक्ते

Web Title: Lalu Yadav again in the slot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.