लालूंच्या थोरल्या मुलाने नेत्यांवर उगारला हात; तेजप्रताप पुन्हा चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 12:26 PM2022-04-25T12:26:55+5:302022-04-25T12:28:14+5:30
माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवामी मोर्चा (हम) या पक्षाचा दावा आहे की, इफ्तार पार्टीदरम्यान तेजप्रताप यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर हात उचलला.
एस. पी. सिन्हा
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे थोरले चिरंजीव तेजप्रताप यादव पुन्हा चर्चेत आले आहेत. लालू प्रसाद यांच्या कुटुंबियांतर्फे आयोजित इफ्तार पार्टीदरम्यान तेजप्रताप यांनी आरजेडीच्या दोन नेत्यांवर हात उगारल्याची चर्चा आहे.
घटनादर्शींनुसार विधान परिषद निवडणुकीतील भोजपूरमधील आरजेडीचे उमेदवार अनिल सम्राट यांच्यावर तेजप्रताप यादव यांनी हात उगारला होता. सूत्रांनुसार अनिल सम्राट यांंनीही ‘जशास तसे’ उत्तर दिले. तेथे उपस्थित लोकांनी दोघांना दूर नेले.
माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवामी मोर्चा (हम) या पक्षाचा दावा आहे की, इफ्तार पार्टीदरम्यान तेजप्रताप यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर हात उचलला. हम पक्षाचे प्रवक्ते दानिश रिजवान यांनीही या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, शुक्रवारी राबडीदेवी यांनी आपल्या निवासस्थानी इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला अनिल सम्राट हेही आले होते. त्यांना पाहून तेजप्रताप भडकले आणि त्यांच्यावर हात उगारला. त्यांनीही त्याचप्रकारे उत्तर दिले. नंतर तेथे उपस्थित लोकांनी दोघांना शांत केले.
अनिल सम्राट यांनी डिजिटल मीडियावर तेजप्रताप यांच्याबाबतीत काही अपशब्द वापरले होते. त्यावरून तेजप्रताप हे सम्राट यांच्यावर नाराज होते. ते याचा सूड घेण्याची संधी शोधत होते. संधी मिळताच तेजप्रताप यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हा प्रकार त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाहिला, असे रिजवान यांनी सांगितले.
इफ्तार पार्टीत एकाकी पाडण्याचा बेत
याच दरम्यान, आरजेडीच्या महानगर अध्यक्षांनाही मारहाण झाल्याची घटना घडली. आरजेडीमध्ये सर्वात लोकप्रिय युवा नेते तेजप्रताप आहेत. त्यांच्याविरूद्ध अपशब्द वापरणाऱ्या आमदारांविरुद्ध कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रकार तेजस्वी किंवा मिसा यांच्याबाबतीत घडला असता, तर आतापर्यंत त्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी झाली असती. इफ्तार पार्टीत काही नेत्यांचा तेजप्रताप यांना एकाकी पाडण्याचा बेत होता. तेजप्रतापविरुद्ध आरजेडी नेत्याला अपशब्द बोलायला लावले होते, असा आरोप दानिश रिजवान यांनी केला.