पॅरोलवर बाहेर असलेल्या लालूंना सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 03:44 PM2018-05-11T15:44:50+5:302018-05-11T15:44:50+5:30
लालू प्रसाद यादव यांना सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
रांची- चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणांसाठी हा जामीन देण्यात आला आहे. नुकतंच लालू प्रसाद यादव यांना मुलगा तेजप्रताप यादव यांच्या लग्नासाठी पाच दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. पाच दिवसाच्या पॅरोलवर बाहेर असणाऱ्या लालू प्रसाद यादव यांना सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले लालू प्रसाद यादव 7 जानेवारीपासून तुरूंगात होते. लालूंना बिरसा मुंडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. तुरूंगात असताना तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रांचीमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. लालू प्रसाद यादव यांना नंतर दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. नंतर तिथून पुन्हा त्यांना रांचीला पाठवण्यात आलं.
लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांचा १२ मे रोजी विवाहसोहळा पार पडणार आहे. पक्षाच्या आमदार चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय हिच्यासोबत तेज प्रताप यादव लग्नगाठ बांधणार आहे. पाटणा येथे हा विवाहसोहळा पार पडेल.